वाढीव संचारबंदी आवश्यकच, हा लढा आता माणूस जगवण्यासाठी आहे – सचिन पायलट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

थर्ड अँगल | पाश्चात्य देशांसारख्या जर जास्त प्रमाणात सकारात्मक केसेस आल्या तर आपली आरोग्य सुविधा कदाचित त्या हाताळू शकणार नाही. म्हणून राज्य सरकारने संचारबंदी उठविण्याबाबत स्तब्ध दृष्टिकोन ठेवला पाहिजे असं मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि राज्य काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी व्यक्त केलं. इंडियन एक्सप्रेसच्या संदीप पुखान यांना त्यांनी दिलेल्या मुलाखतीचा हा संपादित भाग.
 
प्रश्न – संचारबंदीचे दोन आठवडे संपले आहेत. आणखी एक आठवडा आहे. जशी तेलंगणाने संचारबंदी वाढविण्याची विनंती केली आहे तशीच इतरांनीही केल्याचे अहवाल आहेत. तुमचे यावर काय मत आहे? 

उत्तर – या सगळ्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी एक आठवडा बाकी आहे, पण मला वैयक्तिकरित्या असे वाटते आहे की आपण संपूर्ण संचारबंदी उठविणासाठी खूप घाई करीत आहोत. आपण एक स्थिर दृष्टिकोन ठेवला पाहिजे. फार आवेशाने आधीच्या मार्गाकडे जाता कामा नये. हो, मला माहित आहे आपल्याला प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. पण आपण आपल्या नागरिकांच्या आरोग्याची जोखीम घेऊ शकत नाही. खरं सांगायचं तर भारतातील संक्रमणाचे प्रमाण पश्चिम युरोप आणि युएसमध्ये पाहिल्याप्रमाणे अनियमित पद्धतीने वाढू शकतं. सद्यस्थितीत आपल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि आपली रुग्णालये ते हाताळण्यासाठी सक्षम नाहीत. या ओझ्याखाली ती कोसळून जातील. हा आजार कोणत्याही धर्म, वंश, विचारधारेत आणि प्रदेशात फरक करत नाही. म्हणून, कोरोना विषाणू (covid-१९) विरुद्धचे युद्ध हे मानवी पातळीवर आणि सर्वांच्या सहकार्याने झाले पाहिजे. 

प्रश्न – ठीक आहे, पण काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात  भारतातील गुंतागुंतीच्या घटकांवर बोलले आहेत. याकडे तुम्ही कसं बघता?

उत्तर – हे बघा, दोन देश अगदी एकसारख्या मार्गावर जात नाहीत. हा प्रश्न फक्त एखाद्या मॉडेलचा अवलंब करण्याचा नाही, पण स्थानिक घटकांमधून काहीतरी घेऊन काम करण्याचा आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, राजस्थानमध्ये ४६,००० पैकी ३८,००० गावांमध्ये आधीच सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी झाली आहे. आम्ही ११,००० पंचायतींमध्ये मास्क आणि सॅनिटायझरसाठी ५०,००० रु मंजूर केले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कायद्याअंतर्गत 
(MGNREGA) काम करणाऱ्या कामगारांची उपस्थिती चिन्हांकित करण्याची प्रणाली बदलली आहे. आता हे (MGNREGA) कामगार त्यांची उपस्थिती जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) नियमानुसार (आणि जे आपल्याकडे आहेत) विषाणूरहित जागांमध्ये चिन्हांकित करतील. त्यांच्या वेतनाचा आधीचा सर्व हिशोब करून ते त्यांना देण्यात आले आहे. आम्ही कामगारांना (MGNREGA) त्यांच्या किटमध्ये 
साबण देऊ केला आहे आणि दिवसातून चार वेळा हात धुण्यास सांगितले आहे. आम्ही गावच्या सरपंचाच्या नेतृत्वाखाली ग्रामस्वच्छता समिती स्थापन करून त्यांना दारोदारी जाऊन जागृती करण्यास सांगितले आहे. विशेषतः ग्रामीण भागात वर्तणुकीबद्दल खात्री पटवून देण्यासाठी हे घटक खूप महत्वाचे आहेत. 

प्रश्न – सकारात्मक केसेसच्या जास्त संख्या असणारे आणि covid- १९ च्या प्रसाराला लवकर नियंत्रित करण्यात आलेले ठिकाण, ‘भिलवाडा’ हे एक मॉडेल म्हणून बघितले जात आहे. तुम्ही आम्हाला तिथली सद्यपरिस्थिती काय आहे आणि तुम्ही तिथं काय केलं हे सांगू शकाल का? 

उत्तर – आता परिस्थिती चांगली असून, नियंत्रणात आहे. ७ एप्रिल रोजी आम्ही काही रुग्णांना दवाखान्यातून सोडले आहे. आता येथील रुग्ण शून्य झाले आहेत. एका डॉक्टरने इथल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्यानंतर इथल्या रुग्णांचा शोध घेतला गेला आणि तपासण्या करण्यात आल्या. अत्यंत वेगाने या ठिकाणी चाचण्या केल्या गेल्या.  आम्ही एक सुपरकर्फ्यू लावला होता. जिथे अगदी माध्यमे, स्वयंसेवी संस्था आणि इतर ऐच्छिक संस्थांनाही कर्फ्यू पास दिला गेला नव्हता. याची संपूर्ण जबाबदारीच शासनाने घेतली होती. दारोदारी जाऊन आवश्यक वस्तू वितरित केल्या होत्या. ताप, थंडी, सर्दी, खोकल्याचा आजार असणाऱ्या लोकांच्या तपासण्या तातडीने करण्यात आल्या. सगळ्या सीमा बंद करुन आम्ही शहरातील लोकांची आणि वाहनांची शून्य हालचाल होऊ दिली. ज्यांच्या घरात लक्षणे दिसत होती त्या घरांची अनेक वेळा तपासणी केली आणि त्यांना अलगावमध्ये वेगळे ठेवण्यात आले. डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना सर्वत्र फिरवले. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे भिलवाडाच्या नागरिकांनी खूप सहकार्य केलं. अशाप्रकारे आम्ही संक्रमण थांबविण्यास सक्षम ठरलो. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमचे लक्ष आजाराच्या केंद्रावरून आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवरून हटवलं नाही. आता असे नियम संपूर्ण राज्यात अनुसरले जात आहेत. उदाहरणार्थ जिथे मी आमदार आहे तिथे शेजारच्या ठिकाणी १८ सकारात्मक केसेस सापडल्या, आम्ही लगेच कर्फ्यू लादला. लोकांचा सहभाग नसल्यास कर्फ्यू किंवा संचारबंदी यशस्वी होत नाही हे आम्हाला माहित आहे. म्हणून लोकांना यामागचे तर्कशास्त्र समजावून सांगणे गरजेचे आहे. पण म्हणून लोकांनी त्यांचे संपर्क वापरून त्याचा गैरफायदा घेऊन कुठेही फिरले  नाही पाहिजे. कर्फ्यूचे गांभीर्य आणि शिस्त टिकवून ठेवणे गरजेचे आहे. 

प्रश्न – केंद्राकडून मिळणाऱ्या निधीबद्दल काय? राजस्थान सरकारने केंद्र सरकारला १ लाख करोड रुपयांच्या पॅकेजसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.

उत्तर –  हे पहा, केंद्र सरकारने जाहीर केलेले १.७३ लाख कोटींचे आर्थिक पॅकेज हे खूप सामान्य पॅकेज आहे. मला असे वाटते की केंद्र सरकारने राज्यनिहाय विशेष पॅकेजवर काम केले पाहिजे, म्हणजे राज्य सरकारला ज्या प्रमाणात निधी मिळेल त्यानुसार ते covid-१९ च्या रुग्णांच्या आवाहनाला सामोरे जाऊ शकतील. मला वाटते, विविध राज्यातील हॉटस्पॉट ओळखून आणि त्यांच्या आर्थिक गरजा बघून आर्थिक पॅकेज बनविले गेले पाहिजेत. 

प्रश्न – आतापर्यंत सरकार म्हणून कोणत्या मोठ्या आवाहनाला तुम्ही सामोरे गेला आहेत? आणि पुढे जात असताना कोणती आवाहने तुम्हाला दिसत आहेत? 

उत्तर – covid -१९ च्या आजारासाठी आम्ही राजस्थानमध्ये १ लाख बेड तयार ठेवले आहेत. राज्यात ४० ठिकाणी आता कर्फ्यू सुरु आहे. डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल कर्मचारी २४ तास काम करत आहेत. जसे आम्ही पुढे जात आहोत तसे आम्हाला व्हेंटिलेटर, वैयक्तिक संरक्षक उपकरणे, किट्स यांची गरज भासेल. सर्वात मोठे आवाहन हे अगदी तळागाळातल्या गरीब माणसालाही अन्न आणि इतर आवश्यक गरजा मिळण्याबाबत सक्षम करणे हे आहे. आतापर्यंत आम्ही आमची संसाधनं, सामाजिक संस्था, मदतीसाठी पुढे येणाऱ्या व्यावसायिक संस्था आणि लोकांच्या मदतीने हे सर्व व्यवस्थापित केलं आहे. पण ही  यंत्रणा थकू शकेल आणि आम्हांला  हे सर्व व्यस्थापित करण्यासाठी इतर संसाधनांची गरज भासली तर ती कोणती असतील याचा शोध आम्ही घेत आहोत. सध्यातरी याचीच भीती वाटत आहे. 

प्रश्न – हे खरोखरच अभूतपूर्व संकट आहे. केंद्र सरकारने विरोधी पक्षाकडे असणाऱ्या अनुभवाचा आणि कौशल्यांचा समावेश करून घेतला पाहिजे अशा सूचना दिल्या जात आहेत. तुमचे काय मत आहे?

उत्तर –  होय, हे आपल्या काळातील सर्वात मोठे संकट आहे. कोणत्याही पक्ष आणि विचारधारेच्या पलीकडचे हे आव्हान आहे. आपण एक राष्ट्र आहोत. त्यामुळे या संकटाचा सामना आपण माणूस म्हणूनच केला पाहिजे. तुम्ही काय क्षमतेत योगदान देऊ शकता? याचा काही फरक पडत नाही. पण योगदान देऊ शकणाऱ्या प्रत्येकाने ते दिले पाहिजे. अर्थात मदत आणि संवादाचा हा दुतर्फा रस्ता असला पाहिजे.

अनुवाद – जयश्री देसाई (9146041816)

Leave a Comment