मुंबई | भारत जगातील सर्वात तरुण देश म्हणून उदयाला येत असून २०२० साली ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षाच्या आतील असेल. मात्र दुसरीकडे भारत मधुमेहाची राजधानी होत आहे, तसेच लठ्ठपणामध्ये देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपली तरुणाई तंदुरुस्त आणि स्वस्थ राहावी यासाठी क्रीडा हा विषय शिक्षणात समाविष्ट करावा. शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयापर्यंत सर्वांनी दिवसातून किमान एक तास खेळासाठी द्यावा, तसेच सर्व विद्यापीठांमध्ये ‘तरुण आणि स्वस्थ भारत’ मोहीम राबवावी अशी विनंती भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी केली. सचिन तेंडुलकर यांनी गुरुवारी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
विद्यापीठांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल राज्यपालांनी सचिन तेंडुलकर यांचे अभिनंदन केले तसेच मोहिमेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ‘तरुण आणि स्वस्थ भारत’ अभियानासाठी कॉर्पोरेट जगताचा सामाजिक दायित्व निधीदेखील मिळू शकेल असे त्यांनी सांगितले. आदिवासीबहुल क्षेत्रामधील खेळाडूंना मदत करण्याच्या सचिन तेंडुलकर यांच्या भूमिकेचेदेखील राज्यपालांनी स्वागत केले.
मे महिन्यात सचिन तेंडुलकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट देऊन ‘तरुण आणि स्वस्थ भारत’ अभियान राबविण्याबद्दल पुढाकार घेतला होता. हे अभियान राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये राबवावे या दृष्टीने तेंडुलकर यांनी राज्यपालांशी चर्चा केली.
यावेळी क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरभ विजय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, क्रीडा पत्रकार सुनंदन लेले, डॉ. जयश्री तोडकर आदी उपस्थित होते.
भारत हा क्रीडाप्रेमी देश असून आता प्रत्यक्ष खेळणारा देश झाला पाहिजे. लहान मुलांमधील क्रीडा नैपुण्य हेरणारे उत्तम प्रशिक्षक देशाला हवे आहेत. देशात अनेक निवृत्त खेळाडू आहेत. त्यांच्या सेवा प्रशिक्षक म्हणून वापरल्या जाव्यात, असेही मत तेंडुलकर यांनी व्यक्त केले.