‘सेक्रेड गेम्स’च्या गणेश गायतोंडेचा पुन्हा कमबॅक

Sacred Games Season Comming Soon
Sacred Games Season Comming Soon

मुंबई | ‘कभी कभी लगता है अपुन ही भगवान है’ म्हणणारा ‘सर्वसक्तीसाली’ गणेश गायतोंडे परत येतोय. इंटरनेटवर तुफान व्हायरल झालेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सिरीजच्या दुसऱ्या सिझनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. नेटफ्लिक्सने ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा केली आहे.

‘सब चले जाएँगे, सिर्फ़ त्रिवेदी बच जाएगा!’ असं नेमकं का होणार? २५ दिवसात काय घडणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी चाहतेसुद्धा उत्सुक आहेत. त्यात आता दुसऱ्या सीझनची अधिकृतरित्या घोषणा झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे. ‘सेक्रेड गेम्स’ च्या पहिल्या सीझनमधील प्रसिद्ध झालेले डायलॉग्स या टीझरमध्ये ऐकायला मिळतात. ‘इस बार तो भगवान खुद को भी नही बचा सकता!’असं म्हणत संपणाऱ्या या टीझरमुळे पुढील सीझनबद्दलच्या अपेक्षादेखील वाढल्या आहेत. काही तासांतच हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सीझन २ लवकर प्रदर्शित करण्याची चाहत्यांची मागणीही जोर धरू लागली.

नेटफ्लिक्सवर रिलिज झालेली इंडियन वेबसीरीज ‘सेक्रेड गेम्स’ देशात प्रचंड प्रमाणात गाजली. या सिरीजचा पहिला भाग संपत नाही, तर दुसरा भाग कधी येणार याची चाहते आतुरतेने वाट बघत होते. इतकेच नाही तर या प्रेक्षकांनी या सीरिजच्या दुसऱ्या भागाची मागणी देखील केली होती.

अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीने दिग्दर्शित केलेल्या या सिरीजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यानी गणेश गायतोंडेची मुख्य भूमिका साकारली असून सैफ अली खान, राधिका आपटे आणि कुबरा सैत यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.