हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई ड्रग प्रकरणानंतर अंमली पदार्थांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत असताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खोचक पत्र लिहीत शेतकऱ्यांना हर्बल तंबाखूच्या लागवडीची परवानगी द्या अशी मागणी केली आहे.
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या जावयाकडे हर्बल तंबाखू सापडली होती. एनसीबीला तंबाखू आणि अमली पदार्थातील फरकही कळत नाही, अशी टीका एनसीबीवर केली होती. हाच धागा पकडत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पत्र पाठविले आहे. सरकार मदत करत नाही हे बघून अनेक शेतकऱ्यांना गांजासारखे पीक घ्यावे असे वाटू लागले आहे. गांजा ही एक जगात कायम मागणी असलेली वनस्पती आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
राज्यात गांज्यासारख्या मौल्यवान हर्बलची लागवड करायची असल्यास सरकारची परवानगी लागते. जी सहजासहजी मिळत नाही. पण अलिकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक वरीष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे. नवाब मलिक यांचे जावई या मौल्यवान हर्बल तंबाखू तून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत. तरी आपणास नम्र विनंती आहे की या हर्बल तंबाखूच्या लागवडी साठी आसुसलेल्या शेतकऱ्यांना आपण तात्काळ परवानगी मिळवून द्यावी. जेणेकरुन महाराष्ट्रातील गरीब शेतकरी व कष्टकरी शेतमजूर नवाब मलिक यांच्या जावयासारखा श्रीमंत होईल. असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.