पवारांनी डाव टाकला अन शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला; सदाभाऊंचा निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील (SKP Jayant Patil) यांचा पराभव झाला. शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र २३ मतांचा कोटा जयंत पाटलांना पूर्ण करत आला नाही. त्यांना अवघी १२ मते मिळाली आणि त्याचा पराभव झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे बाकीचे २ उमेदवार काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर मात्र विजयी झाले. या एकूण सर्व प्रकारानंतर रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला, पवारांनी डाव टाकला अन शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला

प्रसारमाध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, जयंत पाटील हे शेकापचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या चळवळी या महाराष्ट्रात उभ्या केल्या. मात्र त्याच जयंत पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम जाणता राजा म्हणवल्या जाणाऱ्या शरद पवारांनी केलं हे आता स्पष्ट झालं आहे. तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार आणू शकता, मग जयंत पाटलांसारख्या लढाऊ माणसाचा घात का केला? याचेही उत्तर शरद पवार आणि महाविकास आघाडीला द्यावं लागेल असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.

ते पुढे म्हणाले, या राज्यात शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचे काम खऱ्या अर्थाने शरद पवारांनीच केला आहे. महाविकास आघाडीवेळी मुख्यमंत्री होताना आणि भाजपची साथ सोडताना उद्धव ठाकरे तुमचं ऐकतात आणि मग जयंत पाटलांच्या उमेदवारीवेळी उद्धव ठाकरेंनी तुमचं का ऐकलं नाही? असा सावळा करत हा सगळा शरद पवारांनी टाकलेला डाव होता आणि या डावात जयंत पाटलांचा बळी गेला असा आरोप सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केला.

दरम्यान, संजय राऊत यांनी मात्र शरद पवारांनी जयंत पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केल्याचे सांगितलं. शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडी मधील एक महत्वाचा घटकपक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत रायगडमध्ये त्यांनी महाविकास आघाडीचे काम प्रामाणिकपणे केलं होते. पवार साहेबानी जयंत पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले मात्र आमच्याकडे जी मते होती त्यातच आम्हाला खेळावं लागलं आणि जयंत पाटलांचा पराभव झाला असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.