सातारा प्रतिनिधी | विशाल पाटील
यापूर्वीच्या काळात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या जोडीने मोठी चळवळ उभी करून क्रांती केली. मात्र आता त्यांची अवस्था अशी आहे की, राजू शेट्टीचे अवघड जागेचं दुखणं झाले आहे, ते एका पक्षांशी बाधले असल्याने त्यांना आंदोलन करता येत नाही. तर सदाभाऊ खोत यांनीही पक्षांचा बिल्ला लावल्याने त्यांची एका पाळीव प्राण्याप्रमाणे अवस्था झालेली आहे. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी छो म्हटले की पळायचे अशी अवस्था असल्याची टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केली आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आज 2 नोव्हेंबर रोजी ऊस दर व त्यासंदर्भातील बळीराजा शेतकरी संघटनेची भूमिका याबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी.जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, बळीराजा कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यादव, उपाध्यक्ष अविनाश फुके, उत्तम खबाले, मनोज खबाले, सागर कांबळे आदींची उपस्थिती होती.
पंजाबराव पाटील म्हणाले, सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांना राजकीय पक्षांनी दोन गाजरे बांधले आहेत. त्यामुळे खरे आंदोलन कोणी केले हे तुम्हांला संघर्ष यात्रेतून कळेल. काल कराडमध्ये आ. सदाभाऊ खोत यांनी शो केला. त्यांनी सहकार मंत्र्यांच्या विरोधात मोठे आंदोलन करायला पाहिजे होते. दोघेही केवळ राजकीय फायद्यासाठी आंदोलन करत आहेत.