संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात ‘एवढ्या’ दिवस मुक्काम

saint dnyaneshwar maharaj palkhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी रविवार, दि. 11 जून 2023 रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. यावर्षी सातारा जिल्ह्यात एकूण पाच मुक्काम असणार आहेत. यावर्षी लोणंदमध्ये दोन, तर फलटण तालुक्यात तीन मुक्काम होणार आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जिल्ह्यात पाच दिवस मुक्कामाला असल्यामुळे लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे भक्तांचा मेळा पाहण्यास मिळणार आहे.

पालखी सोहळा संस्थेच्या वतीने नुकतेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार रविवार, दि. 18 जून 2023 रोजी पालखी सोहळा नीरा स्नान व आरती होईल. त्यानंतर सातारा जिल्ह्यात ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होईल. पाडेगाव येथे सातारा जिल्ह्याच्या वतीने स्वागत केल्यानंतर रात्री लोणंद येथे हा सोहळा मुक्कामी राहील. दुसऱ्या दिवशी सोमवार, दि. 19 जून रोजी पालखी लोणंद येथेच मुक्कामी असणार आहे.

लोणंद येथील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर मंगळवार, दि. 20 जून रोजी पालखी सोहळा तरडगाव (ता. फलटण) येथे मुक्कामाला प्रस्थान करेल. दुपारी चारच्या दरम्यान दिवशी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होईल. त्यानंतर तरडगाव येथे ज्ञानेश्वर पालखीचा मुक्काम राहील. बुधवार, दि. 21 जून रोजी पहाटे पाच वाजता फलटणकडे प्रस्थान करेल. दत्त मंदिर काळज, सुरवडी, निंभोरे ओढा, वडजल येथे विसाव्यासाठी पालखी काही वेळ थांबेल. त्यानंतर सायंकाळी सोहळा पालखी फलटण विमानतळावर मुक्कामी असेल.

दि. 22 जून रोजी पालखी सोहळा बरडला प्रस्थान करेल. या मार्गावर विडणी, पिंपरद, निंबळक फाटा येथे विसावा घेतल्यानंतर तो बरडकडे मुक्कामासाठी मार्गस्थ होईल. बरड मुक्कामानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान करेल. पंढरपूर येथील गोपाळकाल्याच्या कार्यक्रम होऊन पालखीचा 3 जुलै रोजी पुन्हा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. सातारा जिल्ह्यात परतीच्या प्रवासात सहा जुलैला फलटण तर पाडेगाव येथे सात जुलै पालखीचा मुक्काम राहणार आहे.