सजना : जातजाणिवांच्या पलीकडे जाऊन प्रेमाची ताकद दाखवणारा, अंतर्मुख करणारा चित्रपट

sajana movie
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाने जातीबाहेर प्रेम करायचं म्हटलं की सतराशे साठ अडचणी समोर आ वासून उभ्या राहिलेल्या आपण पिढ्यानपिढ्या पाहत आलो. केवळ प्रेमच कशाला, शिक्षण घ्यायचं म्हटलं; नोकरी करायची म्हटली तरी न्यूनगंड आणि अपराधीपणाचा शिक्का सोबत घेऊनच जगण्याची कसरत या भटक्या विमुक्तांना करावी लागली. देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी यांच्या स्वतंत्र असण्याकडे पांढरपेशा लोकांनी विशेष लक्षच दिलं नाही. रस्त्यावर लिंबू-मिरची, खेळणी विकून, तमाशात नाचगाणं करून, रस्त्याने अंगावर चाबकाचे फटके मारून घेत पोतराजकी करून या लोकांनी आजपर्यंत आपली गुजराण केली. यांच्याकडे सहानुभूतीने पाहण्याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही याचा अनुभव तुमच्या-माझ्यासारख्या कित्येक जणांनी वारंवार घेतला. मात्र हीसुद्धा आपल्यासारखी हाडामांसाची माणसंच आहेत. त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा, पुढे जाण्याचा अधिकार आहे ही जाणीव करून देण्यासाठीचे प्रयत्न अलीकडच्या काळात होऊ लागले. डिजिटल क्रांतीच्या युगात सिनेमा, सोशल मीडिया हे माध्यम अशा लोकांचा आवाज बनू पाहतय ही समाधानकारक गोष्ट आहे. हाच आवाज नेमकेपणाने मांडण्याचं काम शशिकांत धोत्रे या दिग्दर्शकाने सजना या चित्रपटातून केलंय. बिगारी कामगार ते चित्रकार आणि तिथून दिग्दर्शक बनण्यापर्यंतचा शशिकांत यांचा प्रवास प्रेरणादायी म्हणावा असाच आहे. कुठलाही मोठा कलाकार दिमतीला न घेता स्वतःला समजलेलं सामाजिक वास्तव लोकांच्या मनावर बिंबवण्याचा चांगला प्रयत्न म्हणून सजना चित्रपटाची दखल घ्यावीच लागेल.

माणसाचं माणूसपण नाकारणाऱ्या तथाकथित उच्च जातींनी फुले, शाहू, आंबेडकरांनाही सोडलं नव्हतं. स्वतःला सुप्रीम समजत आपल्यापेक्षा खालच्या समजल्या जातींचं शोषण करायचं, त्यांना कमीपणा दाखवायचा हे काम आपल्या समाजात कायमच होत आलं. तुम्ही शिक्षण घ्या, समृद्ध व्हा, पैसा कमवा पण एकदा का जातीने तिचा डंख मारायचा ठरवलं की तुमची खैर नाही हे चित्र आपण वर्षानुवर्षे पाहत आलो. या सगळ्यामुळे वाट्याला येणारी अवहेलना झेलत जगणं हे खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतील लोकांना, भटक्या विमुक्तांना सोपं कधीच नव्हतं. आजही नाही. या सगळ्यावर मात करण्याचं बळ प्रेमाने आणि शिक्षणानेच मिळेल याचा अनुभवही लोक आता घेऊ लागलेत. असाच एक सुखद अनुभव सजनाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पहायला मिळेल.

मराठी चित्रपटसृष्टीत मागील १०-१२ वर्षांत फँड्री, सैराट, ख्वाडा, टीडीएम, बबन या चित्रपटांनी जातीच्या चौकटीपलीकडे पाहण्याची गरज समाजाला दाखवून दिली. यापैकी जवळपास सर्वच चित्रपटांच्या शेवटाला जातवर्चस्वाची, त्यातून भोगाव्या लागणाऱ्या परिणामांची निगेटिव्ह शेड होती. जे आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न नागराज मंजुळे, भाऊराव कऱ्हाडे या दिग्दर्शकांनी केला. याचंच पुढचं पाऊल शशिकांत धोत्रे यांनी सजनाच्या माध्यमातून टाकलंय.

उच्चशिक्षण घेत असतानाच एमपीएससी करून स्वतःसोबत कुटुंब आणि समाजाचं भलं करू इच्छिणारा सजना आणि या प्रवासात त्याला मनोमन साथ देणारी वंदना यांची लव्ह स्टोरी ही सजनाची कोअर थीम आहे. सजना हा भटक्या जातीतला तर वंदना ही सामान्य प्रवर्गातली. घरी दोन वेळचं अन्न मिळण्याची मुश्किली असलेल्या, सण-समारंभात वाजंत्री म्हणून पिढीजात काम करावं लागणाऱ्या सजनाला वंदनाच्या रूपाने प्रेमाचा खंबीर आधार मिळतो. स्वतःच्या कष्टाने आणि वंदनाच्या प्रेमाने परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सजनाची कहाणी कुठेही अवास्तव वाटत नाही. कितीही अडचणी आल्या तरी सजनाला कुठल्याही परिस्थितीत सोडायचं नाही हा वंदनाचा निर्धारही गाव-खेड्यांतील मुलींचं प्रातिनिधिक दर्शन घडवतो. हा सगळा प्रवास एका बाजूला सुरू असताना पुढे जात आडवी आली तर काय करायचं ही भीती दोघांच्याही मनात सतत येत असतेच. त्या भीतीचं पुढे काय होतं? शिकून सावरून शहाणपणा अंगी यावा अशी अपेक्षा असलेले वंदनाचे वडील आणि भाऊ कसं वागतात? प्रेमात नकार पचवावा लागला तर सूडभावनेने वागायचं की समोरच्याला त्याची वाट मोकळी करून द्यायची? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं डोळसपणे समजून घेण्यासाठी तुम्ही सजना चित्रपट आवर्जून पहायला हवा.

सजनाची भूमिका केलेला आकाश सर्वगोड, वंदनाची भूमिका केलेली तृप्ती मोरे, दिनेशची भूमिका केलेला संभाजी या नवोदित कलाकारांनी आपली छाप चित्रपटावर सोडली आहे. सर्वच कलाकारांचं कास्टिंग चांगलं जमून आलंय. चित्रपटातील अनेक फ्रेम्स या लक्षात राहण्यासारख्या आहेत. यामध्ये सुकट-बोंबीलची फ्रेम असो किंवा आठवडी बाजारात मिळणाऱ्या कपड्यांचा ब्रँड असो, सजना आणि वंदनाच्या कपड्यांतील वेगळेपण असो किंवा लखनची सायकल आणि दिनेशच्या बुलेटची फ्रेम असो, दिग्दर्शकाने हे बारकावे खुबीने टिपले आहेत. संगीत ही सिनेमाची आणखी एक जमेची बाजू. सैराटसारखी या सिनेमाची सगळीच गाणी लक्षात राहतील असं नाही, पण ग्रामीण ढंगात लिहलेली, अल्लड आणि शृंगारिक प्रेमाचा मिलाप असलेली, भीषण सामाजिक वास्तवावर भाष्य करणारी गाणी चित्रपट पाहताना तुमच्या मनाचा ठाव घेतील. सोनू निगम, आदर्श शिंदे, ओंकारस्वरूप, कडूबाई खरात यांनी आपापल्या गाण्यांतून छाप सोडली आहे. सुहास मुंडे यांनी लिहिलेली गाणी म्हणजे चेरी ऑन द टॉप कार्यक्रम झालाय. बाकी वेशभूषेच्या बाबतीतही वेगळेपण (विशेषतः वंदना आणि सजनाची कपडे) तुम्हाला जाणवून येईल.

हा चित्रपट म्हणजे केवळ गावाकडची लव्हस्टोरी नाही. जातीचं वास्तव समजून घेऊन माणूस म्हणून स्वतःला अंतर्मुख करायला लावणारी ही कहाणी आहे. प्रेमासोबत शिक्षणाचं महत्त्व सांगणारी, मुलांसोबत पालकांनाही स्वतःच्या विचारांना तपासून घ्यायला लावणारी साधी-सोपी कहाणी. समजून उमजून केलेल्या प्रेमाच्या ताकदीचा परिणाम दाखवणारा हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे.

तळटीप – पुण्यात या चित्रपटाचा प्रीमियर शो पाहून बाहेर पडत असताना नागराज मंजुळे आणि शशिकांत धोत्रे एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसले. दोघांनी एकमेकांची गळाभेटही घेतली. ‘फँड्री’पासून सुरू झालेलं सामाजिक संवेदनशीलतेचं एक वर्तुळ ‘सजना’पाशी येऊन पूर्ण झाल्याचं मनोमन वाटलं. प्रीमियर शो पहायला तेजस्वी सातपुते, महेंद्र मुंजाळ, मोहिनी कारंडे, शरद तांदळे, किरण माने, अन्वर राजन, संजय भास्कर जोशी, पैगंबर शेख, प्रशांत भोसले, प्रतिक पुरी, नितीन थोरात, हिनाकौसर खान, श्रीरंजन आवटे, सुकल्प कारंजेकर, जीवन आघाव ही आणि इतर ओळखीतील बरीचशी मंडळी आली होती. हॉटेल भाग्यश्रीचे सर्वेसर्वा नागेश भाऊ मडके आपल्या पत्नीला घेऊन आले होते. आम्ही दोघांनी समोरासमोर आल्यावर एकत्रच – नाद करती का? यावंच लागतंय, पिक्चर बघायलाच लागतोय असं म्हणत एकमेकांना दाद दिली. एकूणातच काय आपल्या माणसांच्या या संपूर्ण गोतावळ्याला ‘सजना’ने भरभरून आनंद दिला. तुम्हीही हा आनंद अनुभवायला २७ तारखेपासून जवळच्या चित्रपटगृहात हजेरी लावा. संपर्कातील इतरांनाही आवर्जून सांगा.

  • योगेश नंदा