औरंगाबाद | कोरोना महामारीच्या संपूर्ण काळात रोजगारी वाढली आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. ही परिस्थिती अजूनही सुधारलेली नसून कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार पाच महिन्यापासून रखडले आहे. परंतु आता लवकरच कर्मचाऱ्यांना पगार दिले जाणार आहे.
शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मनपासाठी आठ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी दिली आहे. त्याचबरोबर कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने डॉक्टर आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवण्यात आले आहे. मार्च 2021 पासून या 750 कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या वेतनासाठी टास्क फोर्स समितीने 1 कोटी 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अजूनही निधी उपलब्ध करून दिलेला नाही. यासाठी महापालिकेने टास्क फोर्स च्या समितीकडे निधी संदर्भात मागणी केली होती.
शुक्रवारी घेण्यात आलेल्या जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त बीबी नेमाने यांनी मनपातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीकडून प्राप्त झालेला 8 कोटींचा निधी कर्मचाऱ्यांसाठी मंजूर करून दिला आहे.