सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेंतर्गत भ्रष्टाचारासह समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांनी केलेल्या जिल्हा नियोजन समितीमधील कामाच्या चौकशी करुन त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी समतावादी महासंघाच्यावतीने बुधवारी जिल्हा परिषदेवर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. कवठेएकंद येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत नवबौद्ध वस्ती सुधार योजनेअंतर्गत कवठेएकंद येथे हाय मास्ट लाईटचे पोल उभारण्यात आले आहेत. हे पोल दलित वस्तीमध्ये न बसवता इतर ठिकाणी बसवले आहेत. या कामाशी संबधित जिल्हा परिषदेचे समाजकल्याण माजी सभापती प्रमोद शेंडगे त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी जे कोणी या पाठीमागे दोषी आहे.
त्यांची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात दलित वस्तीमधील निधी हा त्याच ठिकाणी खर्च केला आहे का? याचे थर्ड पार्टी ऑडिट करावे. त्या कामाची पात्रता तपासावी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले आहे का ? आराखड्याप्रमाणे कामे केली आहेत का? त्याचेही थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली. शेंडगे यांच्यासह जे दोषी अधिकारी असतील, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर समतावादी महासंघाच्यावतीने अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.