व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

समृद्धी महामार्गावर दुसरा मोठा अपघात; 16 जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र अद्यापही सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी झालेली बुलढाणा बस अपघाताची घटना ताजी असतानाच आता आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर दुसरा मोठा अपघात घडला आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबेजवळ पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आत्तापर्यंत 16 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे..

इगतपुरी ते मुंबई या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला. सरळआंबा जवळील समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना सिमेंटच्या पुलाचे भाग उचलणारे भलंमोठं मशीन कोसळलं. त्यामुळे त्याठिकाणी काम करणारे मजूर या मशीन खाली दबले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्याठिकाणी 22 मजूर काम करत होते. त्यातील 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर बाकी मजूर सुद्धा अडकल्याची भीती आहे.

रात्रीच्या वेळी अंधार असल्याने गर्डर आणि मशिनच्या सांगाड्याखाली नेमके किती जण अडकले आहेत ते अजून स्पष्ट झालेलं नाही. NDRF पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम सुरु आहे. परंतु या अपघातानंतर पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग हा मृत्यू मार्ग तर ठरत नाही ना हा प्रश्न निर्माण झाला आहे.