Tuesday, February 7, 2023

अनेक वर्षापासुन हाहाकार माजवणारी चंदन तस्कराची टोळी जेरबंद

- Advertisement -

औरंगाबाद : दोन वर्षापासून शहरातील वेगवेगळ्या भागातील चंदनाची झाडे तोडून नेणाऱ्या चंदन तस्करांच्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री सावंगी केंब्रिज चौक रस्त्यावर बेड्या घातल्या. या टोळीकडून 21 किलो चंदनाचे लाकूड, दोन मोटारसायकली, मोबाईल आणि रोख रक्कम अशा सुमारे 1 लाख 94 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गौसखान मेहमूद खान ( 60, रा. फाजलवाडी, ता.फुलंब्री), अनिस खान अयुब खान (21, रा. आडगाव माहुली), नसवब खान अली खान(24, रा. आडगाव ) आणि सलीम मोहम्मद खान (26, रा. फाजलवाडी ) अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत. गतवर्षी सुभेदारी विश्राम गृह, जिल्हाधिकार्‍यांचे निवासस्थान श्रेय नगर उस्मानपुरा वाळूज एमआयडीसी आदी 16 ठिकाणी आणि यावर्षी चार ठिकाणी चंदन चोरीच्या घटना घडल्या होत्या. या टोळीने दोन वर्षापासून उच्छाद मांडला होता. या घटनांची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त यांनी चंदन चोरांना पकडण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले. सहाय्यक आयुक्त रवींद्र साळोखे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमोल देशमुख या टोळीच्या मागावर होते. रात्री ही टोळी चोरीचे चंदन विक्री करण्यासाठी सावंगी ते केंब्रिज चौक रस्त्याने जाणार असल्याची गुप्त माहिती, खबर्‍याने गुन्हे शाखेला दिली.

- Advertisement -

पोलीस उपनिरीक्षक देशमुख, कर्मचारी नंदकुमार भंडारे, किरण गावंडे, संजयसिंह राजपूत, महिला कॉन्स्टेबल मोहिनी चिंचोळकर यांच्या पथकाने मध्यरात्रीनंतर सावंगी बायपास करून नारेगाव चौफुलीवर सापळा रचला.यावेळी दोन मोटारसायकलवरून जाणाऱ्या पाच जणांना पोलिसानी अडवले असता पोलिसानी त्यांना पकडले. यावेळी त्यांच्याजवळील गोणपाटात 21 किलो चंदनाचे तीन तुकडे आढळून आले.