तौलनिक अभ्यासावरील ‘संगम’चे प्रकाशन; इंग्रजीतील दर्जेदार १५ निबंध मराठी वाचकांच्या भेटीला

सातारा प्रतिनिधी | इंग्रजीतील तुलनात्मक अभ्यासावर लिहिले गेलेले १५ दर्जेदार शोधनिबंध मराठीत संपादित करण्यात आले आहेत. या शोधनिबंधावर आधारीत ‘संगम – तुलनात्मक साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी साताऱ्यात पार पडला. डॉ. मनिषा आनंद पाटील यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. त्यांच्यासहित इतर इंग्रजी साहित्यिकांनीही या पुस्तकातील निबंधांचा अनुवाद केला आहे. डॉ. आनंद पाटील यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रकाशन सोहळ्यासाठी साहित्यिक महावीर जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. संभाजीराव पाटणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सक्षम समीक्षाचे डॉ शैलेश त्रिभुवन, प्रा. अनिल पाटील, प्रा. एम.ए. शेख, प्रा. डॉ. मनिषा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

इंग्रजी साहित्यातील तुलनात्मक अभ्यासात काय सुरु आहे याची माहिती मराठीतील लेखक आणि वाचकांपर्यंत पोहचविण्याचा विचार २००५ पासून डोक्यात असल्याचं डॉ. मनिषा पाटील यांनी सांगितलं. वडिलांच्या मार्गदर्शनात १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर माझं पहिलं पुस्तक वाचकांच्या हाती देण्याचा आनंद होत असल्याची भावनाही डॉ. मनिषा पाटील यांनी यावेळी बोलून दाखवली.

मराठीत तुलनात्मक साहित्य वाचणाऱ्यांची आणि समजून घेणाऱ्यांची वानवा असून वाचकांची पर्वा न करता अशी पुस्तकं निर्माण करणं काळाची गरज असल्याचं मत महावीर जोंधळे यांनी व्यक्त केलं.

सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळं महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांनी प्रा.आनंद पाटील यांना जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलं. अनेकांनी त्यांना साहित्यिक दहशतवादी असंही म्हटलं पण तरीही आपला परखडपणा कायम ठेवत डॉ. आनंद पाटील यांनी आपलं काम चालूच ठेवलं याचा अभिमान वाटत असल्याचं डॉ शैलेश त्रिभुवन म्हणाले.

इंग्रजीचे ख्यातनाम प्राध्यापक एम.ए. शेख यांनी आनंद पाटील यांच्या महाविद्यालयीन जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या शैक्षणिक जडणघडणीची माहिती उपस्थितांना दिली. संभाजीराव पाटणे यांनी आनंद पाटील यांच्या रचलेल्या साहित्यावर प्रकाश टाकला. याशिवाय यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याविषयीचा साहित्यिक आस्वादही श्रोत्यांना उलगडून दाखवला. अनिल पाटील यांनी डॉ. मनिषा आणि आनंद पाटील हे साहित्यविश्वातील ‘बहुजन समाजाची प्रकाशाची बेटं’ आहेत अशी कृतज्ञतापूर्व भावना व्यक्त केली.