संगमनेर : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर, प्रशासन, पोलीस आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. लोकांच्या संरक्षणासाठी आणि सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन व्हावे म्हणून पोलीस दिवस रात्र एक करून त्यांची ड्युटी निभावत आहे. मात्र काही ठिकाणी अशा घटना घडत आहे तिकडे सामान्य जनताच पोलिसांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनाच संरक्षणाची गरज आहे की काय अशी परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरात घडली आहे.
संगमनेर शहरात घडलेल्या घटनेने शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये काही तरुण पोलिसांचा पाठलाग करताना दिसत आहेत. तसेच या जमावाने सार्वजनिक ठिकाणी तोडफोड केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामध्ये जमावाने पोलिसांना मारहाणसुद्धा केली आहे. संगमनेर शहरातील दिल्ली नाक्याजवळ हि घटना घडली आहे. संगमनेरमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस कर्मचारी लॉकडाऊन काळात सरकारने लावलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून गस्त घालत होते. त्यावेळी जमावाकडून मारहाण आणि दगडफेक करण्यात आली. जमावबंदीचे आदेश असताना गर्दी का केली, असा सवाल पोलिसांनी विचारल्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला केला आहे. हि घटना गुरुवारी रात्री साडेसहाच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी सहा जणांसह अज्ञात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.