हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव गावचे जवान 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण शहीद झाले आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.
जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. त्यामध्ये जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. रोमित चव्हाण हे 17 मार्च 2017 रोजी सैन्यात भरती झाले होते. सध्या ते राष्ट्रीय रायफल अंतर्गत 4 महार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते.
शनिवारी सकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास दहशतवादी लपून असलेल्या घराला रोमित आणि त्यांच्या सहकारी जवानांनी वेढा घातला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याची संधी दिली होती. वारंवार तसे आवाहन केले. पण दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. एक क्षणही पाऊल मागे न फिरविता रोमित व सहकारी जवानांनीही पुढे चाल करत दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. एका दहशतवाद्याचा खात्माही केला. पण याचवेळी दहशतवाद्यांकडून झाडल्या गेलेल्या काही गोळ्यांनी रोमित यांचा वेध घेतला. आणि त्यांना वीरमरण आले.