कामकुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा दिला इशारा…
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
दुष्काळ निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांची सक्त अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच दुष्काळी भागात उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत कोणी काम कुचराई केली त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ते आज सांगली मध्ये पत्रकारांची बोलत होते.
सांगली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केलेल्या भागात विविध ८ प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट,सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषि पंपाच्या चालू वीज बिलात ३३ टक्के सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा ८ प्रकारच्या सवलती लागू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
या उपाययोजनांची सक्त अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकऱ्यांनी सांगितले. तसेच १९ कोटी ५० लाख रुपयांचा दुष्काळी कृती आराखडा यापूर्वीच सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये ४९६ गावांतील ३ हजार ६०५ वाड्या- वस्त्यांवर 466 टँकर्सचा संभाव्य मागणी करण्यात आली आहे.
सध्या जिल्ह्यात 95 गावांत एकूण 93 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. संभाव्य पाणीटंचाई आराखड्यातून नवीन विंधन विहिरी, विहिरींचे अधिग्रहण, रोजगार हमी योजनेची कामांत वाढ आदि उपाययोजनांबाबत कार्यवाही सुरू असल्याचेही डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.