सांगली प्रतिनिधी । लातूर येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसह तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. यामध्ये नाझीया शेख, लियाकत शेख, बळीराम विरादार अशी त्यांची नावे आहेत. तर चौथा एजंट सुभाष हा अंधाराचा फायदा घेऊन पळाला. गुरुवारी रात्री येथील एस.टी. स्टँड परिसरातील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी विकास कांबळे यांनी फिर्याद दिली.
दरम्यान संशयित आरोपी आणि पीडित मुलगी हे सर्वजण लातूर येथील रहिवासी आहेत. पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचा फायदा घेवून संशयित नाझीया शेख हिने तिला अनैतिक कृत्यासाठी विकण्याच्या हेतूने फिर्यादी विकास कांबळे यांच्याकडे ५२ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी फिर्यादी यांच्याकडुन गुगल पे खात्यावरुन ॲडव्हान्स म्हणून २ हजार रुपये स्वीकारुन उर्वरीत रक्कम सांगलीत आल्यानंतर द्यायची ठरली. त्या प्रमाणे नाझीया शेख ही लातूरवरुन मोटार मधून तिचा भाऊ लियाकत शेख, चालक बळीराम विरादार आणि सुभाष हे अल्पवयीन मुलीस घेऊन रात्री सांगलीत आले.
एस.टी. स्टँडजवळील हॉटेलमध्ये आल्यानंतर पोलिसांनी नाझीया शेख, लियाकत शेख, बळीराम विरादार या तिघांना ताब्यात घेतले. एजंट सुभाष हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. संशयितांकडून ३ मोबाइल, मोटार जप्त करण्यात आली. मात्र सांगलीच्या मध्यवर्ती भागात हि घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सध्या सर्वांची चौकशी सुरु आहे.