बॉलिवूडचा मुन्नाभाई संजय दत्तला कॅन्सरची बाधा, उपचारासाठी अमेरिकेला न्यायच्या हालचाली सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | संजय दत्त. बॉलिवूडमधील डॅशिंग, तडफदार तसंच भावनिक आणि वादग्रस्त व्यक्तीमत्त्वसुद्धा. मागील आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेल्या संजय दत्तची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र अधिक तपासाअंती त्याला कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. श्वास घेण्यात अडथळा आल्याने संजय दत्तला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी आता कॅन्सरचं निदान झाल्याने कुटुंबियांना पुन्हा एकदा जबर धक्का बसला आहे.

बॉलिवूड चित्रपटांतील सर्वच प्रकारच्या भूमिका संजय दत्तने त्याच्या कलाकुसरीने उत्तमरित्या वठवल्या आहेत. कुरुक्षेत्र, साजन, पिता, बडे मिया छोटे मिया, धमाल या चित्रपटांतील रोमँटिक आणि कॉमेडी भूमिका, खलनायक, वास्तव, अग्निपथ, पानिपत या चित्रपटांतील बेरकी भूमिका तसेच मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, पीके या चित्रपटांतील मार्गदर्शक भूमिकांमुळे संजय दत्त लोकांच्या नजरेत कायम राहिला आहे. मागील वर्षी त्याच्या जीवनावर संजू हा बायोपिकही आला आहे. अजून काही चाचण्या केल्यानंतर पुढील उपचाराला सुरुवात करण्यात येईल असं डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान कॅन्सरचं निदान झालं असलं तरी संजय दत्तच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं असून चित्रपट अभ्यासक कोमल नाहता यांनी याबाबत ट्विट केलं आहे. पुढील उपचारासाठी संजूबाबाला अमेरिकेला हलवण्याच्या हालचाली सुरु असल्याचं वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Leave a Comment