म्हणून त्यावेळी शिंदे मुख्यमंत्री बनू शकले नाहीत.., संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट

0
2
Shinde and raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यावर राजकीय वर्तुळात टीकांचा वर्षाव वाढला आहे. त्यामुळे आता भाजप आणि ठाकरे गटातील देखील वातावरण तापले आहे. अशातच काय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेना फुटली नसती, असे विधान केले आहे. त्यावर आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. तसेच, शिवसेना पक्षावर (Shivsena Party) देखील टीका केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत संजय राऊत म्हणाले की, “तुम्ही आता ज्यांच्या दावणीला चोरलेला धनुष्यबाण बांधला आहे, ते योग्य आहे का? रोज उठून दिल्लीत उठा-बशा काढता, त्या बाळासाहेब ठाकरेंना मान्य आहेत का?. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. त्यांनी आत्मचिंतनासाठी कामाख्य मंदिर किंवा अन्य कुठे जायचं असेल तर जावं. आपण मूळ शिवसेनेबाबत जी विधानं करतोय, त्यात किती तथ्य आहे हे तपासावे.”

त्याचबरोबर संजय राऊत यांनी खुलासा केला आहे की, “त्या निर्णयात स्वत: एकनाथ शिंदे सहभागी होते. सामुदायिक निर्णय होता. त्यांनी कधी विरोध केला नाही. त्यांना कुठलं खातं मिळतं, हे त्यांच्यासाठी महत्त्वाच होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं, एकनाथ शिंदे ज्यूनियर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदासाठी विचार झाला नाही”

दरम्यान, “भाजप बरोबर आम्ही सरकार बनवलं असतं, त्यांनी शब्द पाळला असता, तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. दुसऱ्या कोणाचा प्रश्नच नव्हता. उद्धव ठाकरे या बाबतीत प्रामाणिक आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करुन तसा सिग्नल दिला होता. पण भाजपने शब्द पाळला नाही. म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसनेच त्यांना मुख्यमंत्री बनू दिलं नाही” असे पत्रकारांना बोलताना संजय राऊत म्हणले आहेत. त्यामुळे आता यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.