भाजपच्या यशस्वी वाटचालीमागील सूत्रधार ओवेसीच; सामनातून घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापली सुरुवात केली असून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून एमआयएम आणि भाजपवर घणाघात केला. ‘फोडा-झोडा व जिंका’ या मथळ्याखाली सामनातील अग्रलेखामधून ओवेसी यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित करण्यात आलीय. भाजपच्या यशस्वी वाटचालीमागील सूत्रधार ओवेसीच अशी टीका शिवसेनेने केली.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत काय काय पाहावे लागेल, घडवले जाईल ते सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाच्या यशस्वी वाटचालीचे पडद्यामागचे सूत्रधार मियाँ असदुद्दीन ओवेसी व त्यांचा पक्ष चांगलाच कामाला लागल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या निमित्ताने जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याची पूर्ण तयारी ओवेसी महाशयांनी केलेली दिसते,” असं म्हणत लेखाच्या सुरुवातीलाच ओवेसी हे भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय

इतके दिवस उत्तर प्रदेशात अशा प्रकारचे नारे लागल्याची नोंद नाही, पण उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने ओवेसी येतात काय, ठिकठिकाणी भडकावू भाषणे करतात काय, त्यांच्या बेबंद समर्थकांची डोकी भडकवतात काय आणि मग ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची नारेबाजी सुरू होते काय, हा सर्व प्रकार पटकथालेखन ठरवल्याप्रमाणे सुरू असल्याच्या संशयास बळकटी येत आहे.

देशातील मुसलमान शहाणा झाला आहे. त्याला आपले हित कशात आहे हे आता समजू लागले आहे. ‘ओवेसी’सारख्यांना येथील मुसलमान नेता मानायला तयार नाहीत. ओवेसी किंवा त्यांच्यासारखे पुढारी आतापर्यंत अनेकदा निर्माण झाले व काळाच्या ओघात नष्ट झाले. देशाच्या राजकारणात मुस्लिम समाजाला डावलता येणार नाही. मुस्लिमांनी राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय त्यांना त्यांचे हक्क, प्रतिष्ठा मिळणार नाही हे सांगण्याचे धाडस ओवेसी यांच्यासारखे नेते दाखविणार नसतील तर आतापर्यंत मतविभागणी करून आपल्या सुपारीबाज मायबापांना मदत करणाऱ्यांपैकी एक असेच ओवेसींचे नेतृत्व राहील. असे शिवसेनेने म्हंटल

Leave a Comment