Wednesday, February 1, 2023

चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष सुखाने झोपलाय; राऊतांचं भाजपवर टीकास्त्र

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश मधील लखीमपूर येथील शेतकऱ्यांना भाजप मंत्र्याच्या मुलाकडून चिरडणे आणि त्यानंतर प्रियांका गांधी यांना बेकायदेशीर पध्दतीने केलेली अटक यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाष्य करत भाजपवर घणाघाती टीका केली आहे. 4 खून पचवून जगातील सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे अशी टीका संजय राऊतांनी केली.

लखीमपुर खेरीत शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होते. याच भागातले खासदार व केंद्रात गृहराज्यमंत्री असलेले अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष व त्यांचे मित्र जीप गाडीतून एका कार्यक्रमासाठी निघाले होते. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाहून त्यांचा पारा चढला व या महाशयांनी सरळ भरधाव गाडी त्या शेतकऱ्यांवर घातली. शेतकऱ्यांना चिरडून गाडी पुढे गेली, पण चाकाखाली एक शेतकरी अडकल्याने गाडी थांबली. तेव्हा हे सर्व मस्तवाल लोक पळून गेले. संतापलेल्या शेतकऱ्यांनी गाडीचा ड्रायव्हर व इतरांना मरेपर्यंत मारले हे सत्य आहेच. हे सर्व प्रकरण आता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या अंगलट आले आहे.

- Advertisement -

चार शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येचे प्रकरण आहेच, पण त्याच रात्री लखीमपुर खेरी येथे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले. प्रियंका गांधींना धक्काबुक्की केली व बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले. इंदिरा गांधी यांच्या नातीला, राजीव गांधी यांच्या कन्येला भररात्री पोलिसांशी संघर्ष करताना त्या दिवशी देशाने पाहिले. ‘मला का अडवताय? कोणत्या कलमाखाली अटक करताय?’ या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नव्हती! त्यामुळे प्रियंकांची अटक बेकायदेशीरच ठरते! असे संजय राऊत यांनी म्हंटल.

हाथरसपासून लखीमपूर खेरीपर्यंत राहुल आणि प्रियांका त्याच पद्धतीने वागल्या. प्रियांका गांधी इंदिराजींची प्रतिकृती आहेत की नाही हे येणारा काळच ठरवेल. त्या काळाची सुरुवात झाली आहे हे सीतापूरच्या रस्त्यावर प्रियांका यांनी दाखवले. इंदिरा गांधी आणि त्यांची काँग्रेस नको म्हणून १९७७ साली विरोधक एकत्र आले आणि सत्ताधारी काँग्रेसचा पराभव केला. आज सत्तेवर नसलेल्या काँग्रेसचेही इतर विरोधकांना वावडे व्हावे याचे आश्चर्य वाटते”, असं संजय राऊत यांनी नमूद केलं आहे.