हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमद शाहा अब्दाली आणि त्याच्या सुपारी गँगला आव्हान द्या”, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) खुलं चॅलेंज दिले आहे. मागील काही दिवसापासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. यानंतर राज ठाकरेंनी ट्विट करत ठाकरे गटाला इशारा दिल्यानंतर राऊतांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. यावेळी संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले, अहमद शाह अब्दाली महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला हे सगळे सुपारीबाज बळी पडत आहेत. एकदा आम्ही तुम्हाला सांगितलं होते कि बीडमधील घटनेशी शिवसेनेचा संबंध नाही, मग आम्हाला कसली आव्हाने देताय? आम्हाला महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये भांडण लावायची नाहीत. जर कोणी लावत असेल, आम्हाला ते मान्य नाही. महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे हीच आमची भूमिका आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं.
तुम्ही आम्हाला धमक्या देताय, बघून घेऊ वैगरे, मग याच धमक्या अहमद शाहा अब्दालीला द्या ना. जो महाराष्ट्र लुटतोय, मराठी अस्मिता पायाखाली तुडवतोय, महाराष्ट्राची लूट सुरु आहे. त्याला आव्हान द्या ना. त्याला द्या ना आव्हान … तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमद शाहा अब्दाली आणि त्याच्या सुपारी गँगला आव्हान द्यायची भाषा करा. तिकडे शेपट्या घालण्याचे काम करता. आम्हीही हे बघून घेऊ असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.
दरम्यान, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय? असा सवाल विचारणाऱ्या मुस्लीम संघटनेच्या कार्यकर्त्यांची संजय राऊतांनी कुंडलीच बाहेर काढली. जे लोक मातोश्री बाहेर आंदोलन करत होते. हे सगळे एकनाथ शिंदेंच्यासुपारी गँगचे मेंबर आहेत असं म्हणत संजय राऊतांनी सदर आंदोलनकर्त्या व्यक्तींचे शिंदेंसोबतचे फोटोच सर्वांसमोर दाखवले. महाराष्ट्रातले वातावरण खराब करण्यासाठी मिंधे गटाच्या लोकांनी मातोश्रीवर काही मुस्लिम समाजाची लोक पाठवली असा आरोप संजय राऊतांनी केला.