राऊतांच्या सुटकेनं ठाकरेंना नवं बळ; शिवसैनिकांमध्येही नवा जोश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार आणि पक्षाचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जमीन मंजूर झाला. आज ७ वाजता ऑर्थर रोड जेलमधून राऊत यांची सुटका कऱण्यात आली. संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यांनतर शिवसैनिकांमध्ये खऱ्या अर्थाने नवचैतन्य आले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना सुद्धा मोठा आधार आणि बळ मिळाल आहे.

खरं तर 3 महिन्यांपूर्वी शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी करत ठाकरेंची साथ सोडली आणि भाजपसोबत सत्तास्थापन केलं. ठाकरेंची साथ सोडताना शिंदे गटातील आमदारांचा रोख हा संजय राऊत यांच्यावरच होता. राऊत हे शिवसेनेचे खासदार जरी असली तरी ते शरद पवारांचे प्रवक्ते असल्यासारखे बोलतात अशा टीकाही अनेकांनी केला. पण बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेले संजय राऊत हे खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ सैनिक राहिले. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू ठरले.

शिंदे गटाने पक्ष सोडल्यानंतर त्यांच्यावर पहिला वार करणारे संजय राऊतच होते. एकाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांना अंगावर घेऊन शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे संजय राऊतच होते. उद्धव ठाकरेंना आधार देणारे आणि त्यांना भक्कमपणे साथ देणारेही संजय राऊतच आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आणि जिव्हाळा आहे.

संजय राऊत आता तुरुंगातून बाहेर आले असले तरी ठाकरेंपुढे आव्हान खूप आहेत. राऊतांना अटक झाल्यापासून शिवसेनेत अनेक मोठ्या घडामोडी घडल्या . शिवसेना हे नाव निवडणूक आयोगने गोठवलं असून ठाकरेंच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. राज्यातील अनेक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. राऊतांच्या अनुपस्थितीत भास्कर जाधव, विनायक राऊत, सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंची बाजू लावून धरली. पण संपूर्ण राज्यात आणि देशात थेट कॉन्टॅक्ट असणारे, कडवट शिवसैनिक असणारे ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेची जडणघडण पहिली आहे ते संजय राऊत आता तुरुंगातून बाहेर आल्यामुळे शिवसैनिकांना लढण्यासाठी नवा जोश मिळेल.

विशेष म्हणजे येत्या काही महिन्यातच मुंबई महापालिका निवडणुका लागतील. शिवसेनेचा जन्मच मुळात मुंबईत झाला आणि आत्तापर्यंत मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवाच फडकला आहे. पण आता शिंदे गटाने ठाकरेंची सोडलेली साथ, भाजपची वाढलेली ताकद आणि मनसेचा भाजपकडे वाढलेला कल पाहता उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका निवडणूक सोप्पी नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच संजय राऊत बाहेर आल्याने ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. भविष्यात शिवसेनेला याचा किती फायदा होतो? हे पुढील काही महिन्यात कळेलच…