विरोधी पक्षाने काय दिवे लावले? ; सामनातून भाजपवर टीकेचे बाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतच पार पडलं असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावं लागलं. विरोधी पक्षाकडून सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीसांची प्रशंसा होत आहे. मात्र, या प्रकरणावरून सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, हे विरोधी पक्षाला कधी कळणार? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून केला आहे.

लोकांच्या जगण्या-मरण्याचे अनेक प्रश्न सतावत आहेत. त्यावर विधिमंडळात चर्चा घडवून विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला धारेवर धरले असते तर उत्तमच झाले असते, पण एका संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींवर चांगली चर्चा करता आली असती व विरोधी पक्षनेत्यांना त्यांचा अनुभव पणास लावता आला असता. शिक्षण, कायदा – सुव्यवस्थेचे, इतरही काही प्रश्न आहेत. अर्थसंकल्पात एक लाख कोटीची महसुली तूट आहे. असे एक ना अनेक प्रश्न राज्याला भेडसावत आहेत. त्यावर बोलायचे नाही. लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार? असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.

संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाला जास्त जबाबदारीने वागावे लागते, पण महाराष्ट्रात विरोधी पक्षाला अशा जबाबदारीची जाणीव फारशी दिसत नाही. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी शेवट झाला, पण सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले?असा थेट सवाल सामनातून करण्यात आला आहे.

मनसुख हिरेन यांचा मृत्यू जितका धक्कादायक तितकाच धक्कादायक मृत्यू खासदार डेलकर यांचा आहे. अन्वय नाईकप्रकरणी गोस्वामी हे जामिनावर सुटले आहेत यावर विरोधी पक्षाचे लोक काहीच कसे बोलत नाहीत? मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाची प्रत विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात फडकवली. अशीच जबानी डेलकर व नाईक यांच्या पत्नीनेही दिली आहे. त्यांच्या जबाबाची प्रतही सभागृहात फडकवली असती तर न्याय झाला असता.असेही सामनातून म्हंटल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment