हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना 2019 साली मातोश्रीवर बंद खोलीत अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालीच नसल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर देत शिंदेंवर निशाणा साधला आहे. अमित शाह यांच्यासोबत चर्चा झालीच नाही तर मग शाह मातोश्रीवर का आले होते? असा सवाल संजय राऊतांनी केला . तसेच जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता असेही राऊतांनी म्हंटल.
आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाह आणि उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली होती. मात्र मोदी आणि शाहांबरोबर राहून मुख्यमंत्री शिंदेंना खोटं बोलण्याचं व्यसन जडलं आहे. अमित शहा मातोश्रीमध्ये कशाला आले होते ? असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी स्वत:ला विचारावा. त्यावेळेस ते मातोश्रीवर होते का? मी होतो. बंद दाराआड चर्चा झाली तेव्हा मी होतो, एकनाथ शिंदे नव्हते, असा पलटवार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केला आहे.
राऊत पुढे म्हणाले, हा माणूस पूर्णपणे भाजपचा गुलाम आणि नोकर झाला आहे. त्याच्या डोक्यावर परिणाम झाले आहे. त्यामुळे अशी बेताल विधाने करत आहे. परंतु आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाही, बाळासाहेबांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही असे संजय राऊतांनी म्हंटल. काय तर म्हणे शिवसेनेच्या अधिवेशनात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचा ठराव मांडण्यात आला. ही लाचारी कशासाठी? बाळासाहेब ठाकरे असते, तर यांचा कडेलोट केला असता असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंवर टीकेची तोफ डागली.