राज्यात दंगली का घडवल्या जात आहेत? नागपूर हिंसाचारानंतर संजय राऊतांचा परखड सवाल

Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोमवारी नागपूरमध्ये (Nagpur) औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद उफाळलेला दिसून आला. येथे दोन गटात तुंबड हाणामारी झाल्यामुळे हिंसाचार उफाळून आला. या सर्व प्रकारानंतर नागपूरमधील अनेक शहरास संचारबंदी लागू करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी, राज्यात दंगली का घडवल्या जात आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या चार लोकांनी हाता कुदळ -फावडं घेऊन जावं आणि त्यांच्या लोकांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी, असे देखील त्यांनी म्हणले आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

सरकारवर टीका करत संजय राऊत म्हणाले की, “कोणाची प्रेरणा आहे, दंगली का पेटवल्या जात आहेत हा संशोधनाचा विषय आहे. होळीलाही वातावरण खराब केलं, राजापुरात काय घडलं , अन्य भागात काय घडलं हे माहीत आहे. होळीसारख्या सणांना कधी महाराष्ट्रात दंगल उसळली नव्हती, उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळवण्याचा प्रयत्न करतील आपलीच लोकं. काल औरंगजेबाची ढाल करून काही लोक या राज्यात हिंदू-मुसलमान दंगल पेटवत आहेत.”

त्याचबरोबर, “सरकार तुमचं आहे ना, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत ना, दंगली कशाल घडवताय , सरकारने जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी. तुमच्याच विचारांचं सरकार आहे ना , मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या चार लोकांनी हाता कुदळ -फावडं घेऊन जावं आणि त्यांच्या लोकांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावी,” अशा बोचऱ्या शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

इतकेच नव्हे तर, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारधारा अशी आहे, संभाजी राजे आणि शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करायचं. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे भाजपचं कधीच शौर्याचं आणि विजयाचं प्रतिक नव्हतं आणि नाही. त्यामुळे आधी व्हिलन संपवला तर हिरो आपोआप संपवता येतो. त्यामुळे व्हिलनवर हल्ला करून महाराष्ट्रातील हिरोंना संपवा,” असे देखील राऊत यांनी बोलून दाखवले आहे.

दरम्यान, “फक्त अयोध्येत श्रीराम मंदिर उभं करू. जिथे आक्रमण झालं त्या जागेवर. आमचा एका बाबरीशी संबंध आहे. बाकी कोणत्याही मशीद किंवा कबरीशी आमचा हस्तक्षेप असणार नाही. या देशात हिंदू आणि मुसलमानांनी सामंजस्याने राहिलं पाहिजे. तर हा देश आणि राज्य टिकेल ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा लढा हा राम मंदिराचा होता, त्यासाठी बाबरीचं पतन केलं. रोज उठून एक मशीद पाडायची आणि कबर तोडायची हे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी कधी लोकांपर्यंत रुजवलं नाही.” असे म्हणत संजय राऊत यांनी बाळासाहेबांनी जतन केलेल्या हिंदुत्वाची आठवण करून दिली.