हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रफुल्ल पटेल , माझ्या नादाला लागू नकोस, तुला नागडं करेन, मी जर बोलायला लागलो तर महाराष्ट्र सोडून जावं लागेल अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. काल संसदेत बोलताना प्रफुल पटेल यांनी संजय राऊतांना हिंदुत्व आणि वक्फ बोर्ड विधेयकावरून डिवचलं होत, राऊत आणि पटेल यांच्यात राज्यसभेत जोरदार खडाजंगी (Sanjay Raut VS Praful Patel) पाहायला मिळाली.. याबाबत विचारलं असता संजय राऊतांनी पत्रकार परिषदेतच प्रफुल्ल पटेल यांचे वाभाडे काढले.
संजय राऊत म्हणाले, प्रफुल्ल पटेलांवर मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केला होता. त्यांच्यावर इडीची कारवाई झाली. त्यांच्या संपत्या जप्त झाल्या. तुरुंगात जाण्याची भीती असल्याने बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या संबंधांसह भाजपमध्ये गेले आणि राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित शाह यांनी त्यांना आपल्या पक्षात ठेवून घेतले. प्रफुल पटेल संसदेत आहेत याची आम्हाला लाज वाटते.. प्रफुल पटेल हे दलाल आहेत. पटेलांसारखे लोकं कुणाचीच नाहीत. कधी काँग्रेसची दलाली करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांना बाप बाप करत होते. मग दाऊदची दलाली केली आणि इथे आल्यावर मग त्यांची हजार भर कोटीची संपत्ती मोकळी झाली. अशा लोकांची संसदेत उभं राहून बोलण्याची लायकी आहे का? अशा शब्दात संजय राऊतांनी प्रफुल पटेल यांच्यवर निशाणा साधला. आम्ही तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहोत. तुमचे रंग आधी पाहा. कोणता रंग आहे? तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागला आहे. मी प्रफुल्ल पटेलांना सांगतो माझ्या नादाला लागू नको. नागडा करीन मी असा इशाराही त्यांनी दिला.
प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले होते?
वक्फ बोर्डावरून राज्यसभेत चर्चा सुरु असताना प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊत यांच्यात खडाजंगी झाली. पटेल यांनी संजय राऊतांना नाव घेत डिवचण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा बाबरी पाडण्याचे श्रेय अभिमानाने घ्यायचे आणि आमच्या शिवसैनिकांनी ते केले, असे म्हणायचे, पण आता सत्तेसाठी तिकडे गेले आहेत. पहिल्यांदा संजयभैय्यांचे भाषण नरोवा कुंजरोवा होते. रोज फाडफाड बोलत असतात. आज काय बोलू काय बोल नये, हे समजत नव्हते. संजयभैय्या तुम्ही रंग बदलू नका, असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना डिवचले. तर तुम्ही भिऊन बाजू बदलली आहे. आम्ही भिऊन तिकडे गेलो नाही, असा पलटवार संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर केला होता.