हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2024-2025 वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी सादर केला आहे. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या अग्रलेखाच्या शीर्षकालाच निरोप समारंभ असे नाव दिले आहे. तर, “सतत उद्या-उद्याचे गाजर तेवढे दाखवायचे, अशी ही तऱ्हा! सत्य झाकून स्वप्ने विकणाऱ्या सरकारचा हा ‘उल्लू बनाविंग’ फॉर्म्युला आता जनतेनेही पुरता ओळखला आहे” अशा शब्दात मोदी सरकारवर राऊतांनी टीकास्त्र सोडले आहे.
निरोप समारंभाची वेळ जवळ आली…
सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, “यापुढे गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींसाठी काम करणार असल्याचे धाडसी विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केले. म्हणजे गेली दहा वर्षे हे सरकार केवळ आपल्या सुटा-बुटातील मित्रांसाठीच काम करीत होते काय? त्याच सरकारला आता गरीब, महिला, तरुण व शेतकऱ्यांविषयी उमाळा दाटून यावा, याचा अर्थ एकच. सरकारच्या निरोप समारंभाची वेळ जवळ आली आहे. अर्थमंत्र्यांचे भाषण तेच सांगते!”
आम्ही जातो आमुच्या गावा..
त्याचबरोबर, “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याचा सोपस्कार गुरुवारी संसदेत पार पाडला. सोपस्कार यासाठी म्हणायचे की, या अर्थसंकल्पात ठोस म्हणावा असा कुठलाच संकल्प शोधूनही सापडत नाही. ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा’ या धाटणीच्या निरोपाचे भाषण वाटावे याच पद्धतीने अर्थमंत्र्यांनी हा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला” अशी टीका राऊतांनी केली आहे.
पुढे बोलताना, “देशातील सर्वसामान्य जनता, गोरगरीब, कष्टकरी लोक वा मध्यमवर्गीय चाकरमानी यांच्यापैकी कुणालाही काहीही न देणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे बरे-वाईट जे काय असेल ते चित्र रेखाटण्याच्या फंदात न पडता 2014 ला मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून या सरकारने गेल्या 10 वर्षांत काय काय केले, याची जंत्री तेवढी मांडण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला.” असे देखील त्यांनी म्हणले आहे.
मणिपुरात महिलांच्या अब्रूची..
दरम्यान, “महिला कुस्तीपटूंवर अत्याचार होत असताना व मणिपुरात महिलांच्या अब्रूची खुलेआम धिंड काढली जात असताना हे सरकार उघडय़ा डोळय़ांनी बघत राहिले. तीन काळ्य़ा कायद्यांविरुद्ध लढताना देशातील 750 शेतकऱ्यांना हौताम्य पत्करावे लागले, तरी सरकारच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही” अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदी सरकारवर अग्रलेखातून जोरदार टीका केला आहे.