औरंगाबाद | एका 50 वर्षीय माजी उप सरपंचाला बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिडकीन जवळील गाडेगाव येथे आज पहाटे समोर आली आहे. घराच्या काही अंतरावरच रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला.या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.कांता श्रीपती शिंदे असे मृताचे नाव आहे.
या धक्कादायक घटने प्रकरणी नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गावातीलच ओळखीच्या मित्राच्या शेतात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने शिंदे हे रविवारी सकाळीच मित्रा कडे गेले होते. रात्री उशिरा पर्यंत घरच्यांनी त्यांची वाट पाहिली मात्र ते आले नाही. रात्री उशिरा येतील असे नातेवाईकांना वाटले त्यानंतर सर्वजण झोपी गेले. मात्र सकाळी घरातील सदस्य झोपेतून उठल्यावर ते घरात दिसून आले नाही. त्यांचा कॉल ही लागत नसल्याने नातेवाईकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला घेतला असता त्यांच्या शेताच्या अवघ्या पाचशे मीटर अंतरावर डांबरी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात शिंदे यांचा मृतदेह नातेवाईकांना आढळून आला. ही माहिती पोलिसांना समजताच पैठण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भांगरे बिडकीन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, उप निरीक्षक मुंडे, उप निरीक्षक पाटील यांनी तातडीने घटनास्थळ गाठत घटनास्थळाचा पंचनामा केला.व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले.या घटने प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल अशी माहिती बिडकीन पोलिसांनी दिली.