गजानन घुंबरे | परभणी
तब्बल तासाभरापूर्वी विहिरीतील पाण्यात पडलेली महिला हालचाल करत असल्याचे लक्षात आल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी घेत , महिलेचे प्राण वाचविण्याची कौतुकास्पद कामगिरी जिल्ह्यातील एका सरपंचानी केली असुन सध्या या धाडसी युवा सरपंचांची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे .
10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वाघाळा ता .पाथरी गावातील एक महिला विहिरीत पडून मृत्यू झाल्याची चर्चा गावभर पसरली होती .ही माहिती गावचे युवा सरपंच बंटी पाटील यांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली .या दरम्यान घटनास्थळी जाऊन आलेल्या ग्रामस्थांनी महिला मृत झाल्या संदर्भात सरपंचांना सांगितले होते .तरीही एक वेळेस घटनास्थळी भेट देऊ, असे म्हणत सरपंचांनी रात्री घटनास्थळ गाठले तोपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते.
यावेळी मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात विहिरीत महिला बेशुद्ध अवस्थेत तरंगताना त्यांनी पाहिली .परंतु यावेळी जी गोष्ट सर्वांच्या नजरेत भरली नाही अशी महिलेची हालचाल सरपंचांना जाणवली .यावेळी ” महिला जिवंत असून तिला बाहेर काढण्यासाठी कोणीतरी पाण्यात उडी मारा ” , असं त्यांनी उपस्थितांना आवाहन केलं . परंतु रात्रीची वेळ आणि घटनेमुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांमध्ये धैर्य दिसत नसल्याचे पाहून, पुढच्या क्षणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सरपंच बंटी पाटील यांनी पाण्यात उडी घेतली .
सरपंचांनी घेतलेल्या उडी नंतर गावातील दोन तरुणांनी ही याठिकाणी पाण्यात उडी घेतली . अथक प्रयत्नानंतर सदरील महिला पाण्याबाहेर काढत तिला उपचारासाठी पाथरी त्यानंतर परभणी येथील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले . दरम्यान तब्बल पाण्यात एक तास पडूनही दैव बलवत्तर म्हणून सदरील महिला बेशुद्ध अवस्थेत राहत तिचा श्वासोश्वास चालू राहिला . यावेळी वाघाळा गावच्या सरपंचांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे सदरील महिलेला योग्यवेळी उपचार मिळाला आहे.उपचाराच्या चोवीस तासानंतर सदरील महिलेच्या तब्येतीत सुधारणा होत असून युवा सरपंचांनी केलेल्या या धाडसी मदतीमुळे सध्या त्यांच्या नावाची जिल्हाभर चर्चा होत आहे .