२० वर्षांपासून ५ हजार साप, नागांना जीवदान देऊन जपली माणुसकी
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
साप समोर दिसला कि अनेकांचा थरकाप उडतो मात्र सापांशी अगदी मित्रांप्रमाणे त्यांच्याशी खेळणारे सर्पमित्रही आहेत ज्यांच्यामुळे कोणत्याही घरात साप गेला तर एक धाडसी माणसाची गरज भासते अशाच धाडसी माणसाने आज साप पकडून त्याला जीवदान दिले. परिसरात कुठेही साप किंवा नाग निघाला की, नाव निघते सर्पमित्र राजा तोडकर यांचे. गेल्या वीस वर्षांपासून सुमारे ५ हजार साप, नागांना जीवदान देऊन माणुसकी जपली आहे. दरम्यान आज सकाळी सुळकाई रोड येथील विश्वास कदम यांच्या बंगल्याच्या कंपाऊंड लगत निघालेल्या नागाला चपळाईने पकडून निसर्गाच्या सानिध्यात सुुखरूप सोडून देवून जीवनदान दिले.
राजा तोड़कर या युवकाविषयी अधिक माहिती मिळवली असता समजले या युवकाला लहानपणापासून प्राणीमात्रांविषयी विशेष कणव होती. त्यामुळे वयाच्या अठराव्या वर्षांपासून तो घरात निघालेल्या साप, नागांना सुरक्षित ठिकाणी सोडत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून अनेक विषारी, बिनविषारी सर्प, नागांना जीवदान दिले आहे. साप हा शेतकर्यांचा मित्र समजला जातो. सामान्य माणूस त्याला तितकाच घाबरतो.मात्र तितकेच त्याच्याबद्दल गैरसमज आहेत. विट्याच्या राजाने गेल्या वीस वर्षांत मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्याचे काम केले आहे. नाग आणि राजा यांचे मित्रत्वाचे नाते निर्माण झाले आहे. एखादा साप, नाग जखमी रक्तबंबाळ झाल्याचे समजताच तिथे जाऊन चपळाईने पकडून त्याच्यावर औषधोपचार करुन निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देतो. जणू साप, नाग रक्षणाचा राजाने वसाच घेतला आहे.
कधी-कधी तरी प्रसंग त्याच्या जीवावर बेततो. नाग विषारी आहे की बिनविषारी हे न पाहता त्याला वाचविण्याचा त्याचा प्रयत्न असतो. साप, नाग रक्षणाचा घेतलेला वसा अविरतपणे जपत आहे. त्यामुळे आजही विटा परिसरात कुठेही साप, नाग निघाला की राजाची आठवण निघतेच. काठी घेऊन नागाला ठेचू पाहणार्या नागरिकांना परावृत्त करुन अनेेक नागांना जीवदान दिले आहे. त्याच्या वाट्याला काही चित्तथरारक प्रसंग आले आहेत. लहान बाळाच्या पाळण्यात फणा काढून डंख मारु पाहणार्या नागाला चपळाईने पकडून त्याने बाळाचे प्राण वाचविल्याच्या प्रसंगासह अंगावर शहारे आणणार्या अनेक घटनांचे विटेकर साथीदार आहेत.