राज्यातील सर्वात मोठी बगाड यात्रा रद्द; बावधन गावासह ११ गावात जमावबंदीचे आदेश

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा : येथील राज्यातील सर्वात मोठी असणारी बगाड यात्रा यावर्षी रद्द करण्यात आल्याचे प्रांताधिकारी संगीता राजापूरकर -चौगुले यांनी आदेश दिले आहेत. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे राज्यातील भाविकांना यंदाचा बगाड पाहायला मिळणार नाही. बावधन व परिसरातील ११ गावामध्ये २७ मार्च १४ एप्रिल या काळात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

बावधन बरोबर फुलेनगर या गावची काळेश्वरी देवीची यात्राही रद्द करण्यात आली आहे. फुलेनगर येथील देवीची यात्रा तीन दिवस भरत असते. चालू वर्षी फुलेनगर येथील बगाड यात्रेचा दिवस हा मंगळवारी ३० मार्च तर बावधन येथील बगाड यात्रा रंगपंचमी दिवशी म्हणजे २ एप्रिल या दिवशी होणार होती. पोर्णिमेच्या दिवसापासून बगाड यात्रेस प्रारंभ होत असतो.

बावधन येथील बगाड पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. या यात्रेत देवाचा छबिना, कुस्त्यांचा फड, तमाशा त्याचबरोबर पारंपारिक खेळ आयोजित केले जात असतात. वैशिष्टपूर्ण पाहण्यासाठी राज्यातील हजारो भाविकांची याठिकाणी उपस्थिती असते मात्र सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने बावधन व फुलेनगर यासह पांढरेवाडी, वाघजाईवाडी, शेलारवाडी, मातेकरवाडी, अनपटवाडी, नागेवाडी, दरेवाडी आणि कडेगाव या गावात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. छबिना काढण्यासही मनाई करण्यात आली आहे‌. केवळ पाच भाविकांच्या स्थितीत पूजा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बगाड यात्रा कशी असते यासाठी खालील व्हिडिओ पहा :

You might also like