आता सातारकर देखील मटण दर नियंत्रणासाठी आक्रमक! जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मटण दरवाढीवरुन गेले तीन आठवडे कोल्हापुरात वाद धुमसत होता. मात्र मटण दराविरोधात सर्वपक्षीय कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाला यश येत मटणाचे दर फायनल झाले आहेत. आता या मटण आंदोलनाचे पडसाद इतर जिल्ह्यांमध्ये देखील उमटत असलेले दिसत आहेत. मटण दरवाढीविरोधात सातारकर देखील आक्रमक झाले असून त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार अमोल भुसे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दरवाढीच्या नियंत्रणाची मागणी केली गेली आहे.

दरम्यान या निवेदनाद्वारे ,”सातारा जिल्ह्यात सध्या बोकड, शेळी, भेंडी यांच्या मटणाचे दर गगनाला भिडले आहेत. जिल्हा व सातारा शहरामध्ये विविध ठिकाणी ५५० ते ६५० रुपये किलो दराने मटणाची विक्री केली जात आहे. या दरांवर कोणत्याही प्रकारचे प्रशासनाचे नियंत्रण नाही. मटणाचे दर सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल असे नसल्यामुळे सातारा शहरातील व जिल्ह्यातील मटणाचे दर निश्चित करण्यात यावेत” अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पांढरा आणि तांबड्या रश्श्यासाठी लागणार्‍या मटण दराच्या वादावर कोल्हापुरात पडदा पडला आहे. यानंतर आता सातारकर मटण दराबाबत जागरुक झाले आहेत. त्यामुळे आता यावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.