सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
सातारा शहरातील तामजाई नगर मधील श्री नगरी येथील शिवामृत अपार्टमेंट मध्ये रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका फ्लॅटला भीषण आग लागली. विश्वनाथ धनावडे यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून काल हे कुटुंब परगावी गेले आहे. यामध्ये फ्लॅट मधील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील तामजाई नगर मधील श्री नगरी येथील शिवामृत अपार्टमेंट मध्ये विश्वनाथ धनावडे यांच्या मालकीच्या असलेल्या फ्लॅटला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीनंतर धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान फ्लॅटच्या शेजारी असलेल्या रहिवाशानी तत्काळ सातारा पालिकेच्या अग्निशामक दलास तसेच पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस व अग्निशामक दलाचे कर्मचारी तत्काळ या ठिकाणी दाखल झाले.
सकाळी सात वाजण्याच्या सुमार लागलेली आग चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी विझवली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी फ्लॅट मधील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही.