सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक, लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य आज पहाटे पाहावयास मिळाले. पहाटे वेण्णालेकसह लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा 4 अंश पर्यंत खाली गेला आहे.
वेण्णालेक परिसरात आज पहाटे वेण्णालेक नौकाविहारासाठी ये -जा करण्यासाठी असलेल्या लोखंडी बोटीवर काही प्रमाणात हिमकण जमा झाले होते. तर लिंगमळा परिसरातील स्मृतिवन भागात देखील पाने, झाडेझुडपांवर हिमकण पाहावयास मिळाले. या हंगामातील ही पहिलीच घटना असून, थंडीचा कडाका असाच कायम राहिला तर वेण्णालेक परिसरामध्ये पुन्हा हिमकणाचा अनुभव पर्यटकांना मिळेल.
सातारा गारठला : महाबळेश्वरच्या वेण्णालेकचे तापमान 4 अंशावर pic.twitter.com/7qEAozFWzX
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) January 11, 2023
महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे. सध्या वेण्णालेक परिसरामध्ये होणारे हिमकण पाहण्यासाठी व गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पाऊले या थंड हवेच्या निसर्गरम्य ठिकाणी वळत आहेत. वेण्णालेक परिसरामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोटीचा आधार घेतल्याचे पाहावयास मिळत आहे.
महाबळेश्वर पर्यटनास आलेले पर्यटक या कडाक्याच्या थंडीमुळे ”मिनी काश्मीर” ला काश्मीरच्या थंडीचा ”फील” अनुभवयाला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे दिवसभर पर्यटक स्वेटर, शोल्स, मफलर, कानटोपी अश्या गरम वस्त्रे परिधान गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत आहे. हॉटेल्समध्ये पर्यटकांसाठी ”बॉनफायर” ची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे तर शहरालगतच्या अनेक ढाब्यांवर शेकोटीचा आधार अनेकजण घेत आहेत.