हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे (Satara Congress) एक बडे प्रस्थ भाजपच्या वाटेवर असून त्यांना भाजपकडून राज्यपाल पद देण्यात येणार आहे असं विधान करून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी कोणाचं थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या विधानाचा रोख हा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यावर असल्याचे बोललं जात आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी सैनिक संघटनेचे प्रमुख प्रशांत कदम यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर कराडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी वरील दावा करत राजकीय बॉम्ब फोडला.
स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणारा काँग्रेस संघटनात्मक पातळीवर क्षीण होत चालल्याने हा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंगावर घेऊ शकत नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल तसेच सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांना राज्याचे राज्यपाल व्हायचं आहे”, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला. आंबेडकर यांच्या विधानाने चर्चाना उधाण आलं असून काँग्रेसचा हा बडा नेता कोण यावर तर्क- वितर्क लढवले जात आहे. सातारा जिल्हा काँग्रेसचा विचार केला तर राजकीय वजन असलेला काँग्रेसचा नेता म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच बघितलं जातं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी अप्रत्यक्षरीत्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हा आरोप केला का अशा चर्चा सुरु आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा दावा खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप घडू शकतो.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नोटबंदी, कर्जवाढ, बेरोजगारी, सरकारी मालमत्ता विकणे हीच मोदींची गॅरंटी आहे. २०१४ च्या निवडणुकीतील मोदींचा आता करिष्मा संपत चालला आहे. त्यामुळे भाजपचे ‘अबकी बार चारशेपार’ हे धोरण पूर्णपणे उध्वस्त होताना दिसत आहे. भाजप चारशेवरून तीनशे आणि आता दोनशेवर आल्याची परिस्थिती आहे. स्थानिक पक्षांनीच त्यांची हवा काढल्याचे सर्वेवरून दिसते असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.