सातारा । राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. बऱ्याच जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. सातारा जिल्ह्यातही नवीन कोरोना संक्रमित व्यक्ती सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला. वाढत्या कोरोनाच्या संक्रमणामुळे शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी जनतेला विविध सूचना दिल्या. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना संक्रमणात वाढ होताना दिसत आहे. मात्र, घाबरून न जाता काळजी घेण्याची गरज आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे गरजेचे आहे. गर्दी टाळणे, मास्क वापरणे आणि हात स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसापासून कोरोनाबाबत थोडी गंभीरता कमी झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार नाही अशा भ्रमात राहू नका अशा सूचना जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिला.
जिल्ह्यातील वयोवृद्ध लोकांनी विशेष काळजी घ्यावी. कोरोनाची लक्षण आढळल्यास वेळकाढूपणा न करता लवकरात लवकर कोविड टेस्ट करून घ्यावी. उपचार लवकर सुरु झाल्यास रुग्णाला वाचवणे शक्य आहे. निशुल्क कोविड टेस्टची सुविधा शासनाकडून पुरवण्यात येत आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथील जम्बो कोविड सेंटर अजूनही रुग्णांच्या सेवेत आहे. तेथे अजूनही १०० रुग्णांवर उपचार सुरु आहे अशी माहिती शेखर सिंह यांनी दिली.
शाळांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शाळांना जारी केलेल्या दिशानिर्देशांचे पालन शाळा प्रशासनानं करावे. एखादा शिक्षक किंवा विद्यार्थ्याला लक्षणे आढळल्यास लवकर टेस्ट करावी. जेणेकरून एखाद्या शाळेत संसर्ग झाल्यास तो वेळीच आटोक्यात आणता येईल. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेने काळजी घेण्याचं पुन्हा एकदा आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.