हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वयात येत असलेल्या तरुणांचे आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही हे आजवर आपण ऐकतच आलो आहोत. मात्र या रागातून एखाद्याच्या हत्येचा प्रयत्न होऊ शकतो हे सातारा जिल्ह्यात घडलेल्या नुकत्याच एका घटनेने दाखवून दिले आहे. सातारा जिल्ह्यातील एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेत दोन्ही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ या गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाव हदरले आहे. मुख्य म्हणजे याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांकडे आरोपी विद्यार्थ्याची तक्रार केल्यामुळे रागातून त्याने या दोघांवर कोयत्याने हल्ला केला असल्याचे समोर आले आहे. हे तिन्ही विद्यार्थी शिरवळ येथील एकाच शाळेत शिकत आहेत. परंतु काही कारणामुळे या दोन्ही मुलांनी १४ जुलै रोजी शाळेत गेल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याची तक्रार शिक्षकांकडे केली होती. त्यामुळे आरोपी मुलगा या दोन्ही मुलांवर दबा धरून होता.
त्यानंतर शुक्रवार आरोपी मुलगा शाळा सुटायचीच वाट बघत होता. पुढे ६ वाजता शाळा सुटल्यानंतर या मुलाने तक्रार केलेल्या दोन्ही मुलांना रस्तावर अडवले आणि त्याच्यांवर कोयत्याने वार केले. यानंतर हल्ला करुन हा मुलगा तेथून फरार झाला. या घटनेनंतर या दोन्ही मुलांना त्वरीत रुग्णालयात हलवण्यात आले. यातील एका मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांकडून आरोपीची माहिती घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान हा हल्ला एका अल्पवयीन मुलाकडून करण्यात आल्यामुळे या घटनेला अत्यंत गंभीरपणे हाताळ्यात येत आहे. शाळकरी वयात विद्यार्थांच्या निर्माण होणारा राग बघता त्यांना समूपदेशकाची गरज भासत आहे. तसेच पालकांनी देखील मुलांशी संवाद साधण्याची जास्त गरज आहे.