सातारा जिल्हा बॅंक : नविन अध्यक्ष, उपाध्यक्ष 6 डिसेंबरला ठरणार

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणक निकालानंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड सोमवारी दि. 6 डिसेंबरला होणार आहे. याबाबतचे पत्र बँकेने जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे. बॅंकेत विद्यमान अध्यक्ष भाजपचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचेच नाव अध्यक्षपदासाठी गृहीत धरले जात आहे. तर या पदासाठी राष्ट्रवादीचे नितीन पाटील हेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तर उपाध्यक्ष पदासाठी पाटण सोसायटी गटातून विजयी सत्यजितसिंह पाटणकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सहकार पॅनलने 21 पैकी सर्वाधिक 17 जागा जिंकत बँकेवरची सत्ता अबाधित राखली. या निकालानंतर साहजिकच सर्वांना अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने जिल्हा बँकेने पदाधिकारी निकडीसाठी 6 डिसेंबरला विशेष सभा घेण्यासाठीचे पत्र जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांना दिले आहे. त्यानुसार बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा बोलावली आहे. सकाळी 11 वाजता मनोहर माळी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित करणार आहेत. तथापि, विद्यमान अध्यक्ष, आ. शिवेंद्रराजे भोसले व नितीन पाटील अध्यक्षपदासाठी यांच्यात चुरस आहे. उपाध्यक्ष पदासाठी सत्यजित पाटणकर यांच्यासह राजेंद्र राजपुरे, रामभाऊ लेंभे यांच्याही नावाचा विचार केला जावू शकतो. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी कालावधीचा फार्म्युला ठरवला जावू शकतो.