कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
तौक्ते चक्रीवादळात सापडलेल्या 186 मच्छिमारांना मुंबई येथे समुद्र किनारपट्टीवर नाैदलाच्या टीमने महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. मच्छिमारांना सहिसलामत बाहेर काढणाऱ्या महत्वपूर्ण कामगीरी करणाऱ्या टीममध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सणबूर येथील शिवम विठ्ठल जाधव यांचाही समावेश होता. नाैदलाच्या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये जीवांची तमा न बाळगता लेफ्टनंट पायलट शिवमने मदतकार्य केल्याने जिल्हावासीयांना अभिमान वाटत आहे.
तौक्ते वादळ मुंबई येथे धडकताच ताशी १२० ते १४० वेगाने वारे वाहत होते. वादळामुळे समुद्रातील जहाजे व मच्छिमारांच्या नौका उलटल्या. मंगळवार (दि. १८ मे) रोजी सायंकाळी चक्रीवादळामुळे मुंबई येथील अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक मच्छीमार भयानक वादळात अडकून पडले होते. तर काही जहाजावरील कर्मचारी भरकटल्याची खबर मुंबई येथील भारतीय नौदल अधिकार्यांना मिळाली. याच वेळी नौदलाचे लेफ्टनंट पायलट शिवम जाधव यांनी आपल्या नौदलातील सहकाऱ्यांच्या मदतीने रेस्क्यू आॅपरेशन सुरू केले. रात्रीची वेळ असल्याने अंधाराचा सामना करीत त्यांनी रेस्क्यू आँपरेशन चालु करून मदतकार्य सुरू केले.
आय एन एस कोलकता या लढावु युद्ध नौकेवर लेफ्टनंट पायलट शिवम जाधव यांच्यासह तैनात असणाऱ्या जवानांनी प्राणाची तमा न बाळगता, येईल त्या प्रसंगाला तोंड देत जमेल त्या लोकांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यावेळी वादळात अडकलेल्या १८६ मच्छिमारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात जहाजावरील पायलट शिवम जाधव यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या कामगिरीचे नौदल प्रमुखांनी व संरक्षणमंत्री यांनी कौतुक केले. या कामगिरीची ग्रामस्थांना माहिती मिळताच शिवमचे वडील विठ्ठल जाधव सर व आई संगिता जाधव यांचे शिवम बरोबरच कौतुक केले जात आहे.
मुलांचा सार्थ अभिमान : विठ्ठल जाधव
शिवमने सातारा सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यापासूनच एनडीए करण्याचे स्वप्न बाळगले, प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द व चिकाटीने यश प्राप्त केले. नौदलात लेफ्टनंट पायलट पदावर काम करताना जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचविले. याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. देशसेवा करताना अशीच चांगली कामगिरी त्याने करावी, ही सदिच्छा अशी प्रतिक्रिया शिवमचे वडील विठ्ठल जाधव व आई संगिता जाधव यांनी दिली.