जिल्हा शासकीय रुग्णालयात भोंगळ कारभार : सफाई कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा येथील क्रांतीसिह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरु असलेल्या भोंगळ कारभाराविरोधात रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याकडून पोस्टमार्टेमचे काम सफाई कामगारांना लावणे, बदली करण्याची धमकी देणे तसेच भोंगळ कारभार आदी विरोधात रुग्णालयातील सफाई कामगारांनी आंदोलनाचा इशारा आज अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला.

यावेळी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी व रुग्णालयातील भोंगळ कारभाराबाबत रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी निवेदनात म्हंटले आहे की, गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा रुग्णालयात काही वरिष्ठ वैधकीय अधिकाऱ्यांकडून सफाई वर्ग क्रमांक चारमधील कामगारांना भयंकर स्वरूपाचा त्रास दिला जात आहे.

सफाई कामगाराची ऑर्डर असताना त्याचे काम सोडून त्यांना पोस्टमार्टम करण्याचेही काम लावले जात आहेत. वास्तविक पोस्टमार्टमचे काम हे वैधकीय अधिकाऱ्यांनी करायचे असते. तर सफाई कामगारांचे काम हे पोस्टमार्टम झाल्यानंतर बॉडी ठेवणे हे असते. तरी देखील कामगारांना काम लावले जात आहे. त्यामुळे आम्ही संबंधित अधिकार्याना हे काम आम्ही करणार नसल्याची ताकीद दिली आहे. दि. 12 तारखेपर्यंत कामगाराच्या हिताचा जर अधिकाऱ्यांनी निर्णय नाही घेतला तर कामगारांकडून कामबंद आंदोलन करू, असा इशारा आज अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला.