Satara Lok Sabha 2024 : सातारा लोकसभा मतदार संघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आजवर क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण अशा विचारी राजकारण्यांनी इथून लोकसभा लढवलीय. इतिहास पाहिला तर लक्षात येतं कि आत्तापर्यंत एकदाही इथल्या मतदारांनी भाजपच्या विचाराला निवडून दिलेलं नाही. शांत, सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्वच इथून लोकांनी दिल्लीला पाठवलं आहे. अर्थात याला एखाद दुसरा अपवाद असू शकतो परंतु सातारा जिल्ह्यातील मतदार सुज्ञ आहेत अन ते विचार करूनच मतदान करतात असे महाराष्ट्राच्या इतर कानाकोपर्यातील अनेकांची धारणा आहे. असं असलं तरी यंदा मात्र विषय जरा हार्ड झालाय. कारण मागील वर्षी भाजपचे उमेदवार राहिलेल्या उदयनराजे भोसले यांना तिकीट मिळणार नाही अशी चर्चा आहे तर शरद पवारांकडून लढलेले श्रीनिवास पाटील वयाच्या कारणानं निवडणूक लढण्यास जास्त इच्छुक नसल्याचं बोललं जातंय. आता प्रश्न येतो तयार झालेली हि उमेदवारांची पोकळी कोण भरून काढणार हा.
साताऱ्यात मविआ कडून सर्वात एक नंबरला नाव येत ते म्हणजे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांचं. मतदार संघातील मागील ५ वर्षातील काम, लोकप्रियता अन लोकसेवक खासदार अशी बनलेली ओळख यासोबत शरद पवारांचा सच्चा दोस्त या श्रीनिवास पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत. परंतु वयाचं कारण देत श्रीनिवास पाटील पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं सांगितलं जात आहे. आता यानंतर नाव येतं ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं. श्रीनिवास पाटील नसतील तर शरद पवार काँग्रेसला जागा सोडतो पृथ्वीराज यांना उभं करू असा प्रस्ताव पुढे करू शकतात. पूर्वी दोनवेळा मतदार संघातून खासदारकीचा अनुभव आणि स्वच्छ प्रतिमा या चव्हाण यांच्या जमेच्या बाजू आहेत. तसेच पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) लोकसभेत गेले तर कराड दक्षिण मधील उंडाळकरांचा आमदारकीचा रस्ताही मोकळा होत असल्याने हि गोष्ट अनेकांना सोयीची आहे. परंतु वयाच्या या टप्प्यात लोकसभेची रिस्क घेणं अन राज्यात काँग्रेस मजबूत करण्याची महत्वाची जबाबदारी खांद्यावर असताना दिल्लीला जाण्यास चव्हाण तितकेसे तयार होतील असं काही दिसत नाही.
आता तीन नंबरला नाव येतं शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचं. जिल्ह्यात चांगलं नेटवर्क, खमका चेहरा या शिंदे यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र मागील विधानसभेला झालेला पराभव, मधल्या ५ वर्षांत कोरेगाव विधानसभेत वाढलेलं शिंदे गटाच्या महेश शिंदे यांचं वजन पाहता शशिकांत शिंदेंना अगोदर आपला गड मजबूत करणं राजकीय भविष्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे शिंदेसुद्धा लोकसभा लढवण्यास इंटरेस्ट दाखवत नसल्याचं समजत आहे.
शिंदेंनंतर चार नंबरला नाव येतं कराड उत्तरचे आमदार आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांचं. जिल्हा बॅंकेतील स्थान, पालकमंत्री पदाचा अनुभव आणि जिल्हाभर लागणार नेटवर्क या बाळासाहेब पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत. मतांचं गणित जुळवणंही पाटील यांना चांगलं जमत असल्याने बाळासाहेब पाटील यांनी लोकसभा लढवावी असंही म्हटलं जात आहे. परंतु पाटील यांना दिल्लीपेक्षा मुंबईत जास्त रस असल्याने ते स्वतः यासाठी तयार नसल्याचे सांगितले जाते.
यानंतर नाव येत ते म्हणजे सारंग श्रीनिवास पाटील (Sarang Patil) यांचे. विद्यमान खासदारांचे चिरंजीव, मागील पाच वर्षात मतदार संघात प्रत्यक्ष कामाचा अनुभव, आणि शरद पवार यांच्यासोबत कायम एकनिष्ठ राहतील असा विश्वास या सारंग पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत. यासोबत ५२ वर्ष वय असणाऱ्या सारंग यांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी ताकद लावून जिकून आणलं तर भविष्यात सुप्रिया सुळे यांना एक कायमचा विश्वसू साथीदार तयार करण्याची संधी पवारांना आहे. स्वच्छ अन सरळमार्गी व्यक्तिमत्व, अभ्यासू अन शांत स्वभाव असल्यानं सध्याच्या राजकीय गोंधळात मतदारांना सारंग पाटील हा एक आश्वसक चेहरा वाटू शकतो. खासदारकीच्या कार्यकाळात गावागावात केलेली विकासकामे यामुळे श्रीनिवास पाटील याना मिळणारा मतदारांचा कौल सारंग यांच्या पारड्यात पडत असल्याने त्यांचं पारडंही जड होत आहे. त्यामुळे सारंग पाटील हे शरद पवारांसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतात.
सहा नंबरला येतात सत्यजितसिंह पाटणकर. जिल्ह्यातील महत्वाच्या नेत्यांसोबत असणारे चांगले संबंध हि पाटणकर यांची जमेची बाजू आहे. तर यानंतर येणाऱ्या उदयसिंह उंडाळकर यांच्यासाठी उंडाळकर काकांचे जुने जिल्ह्यातील नेटवर्क आणि पाटण, कराड दक्षिण मतदार संघातील मतदारांचा कल या जमेच्या बाजू आहेत. सर्वात शेवटी नाव येत ते शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचं. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना जिल्ह्यात उभं केलेलं नेटवर्क हि माने यांची जमेची बाजू.
सातारा लोकसभा सेफमध्ये जिंकायची असे तर श्रीनिवास पाटील हा हुकमी एक्का शर्यतीत उतरवणं शरद पवारांसाठी सर्वात सोपा पर्याय आहेत. यांनतर येणारी पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील हि नावे दिल्लीला जाण्यास इच्छुक नसतील तर राहतात ती चार नावे. सारंग पाटील, सत्यजित पाटणकर, उदयसिंह उंडाळकर आणि सुनील माने. सारंग पाटील यांना क्षमता असूनही पाहिजे त्याप्रमाणात राजकीय संधी भेटलेली नाही. २०१४ साली पदवीधरची संधी असताना बंडखोरीमुळे त्यांचा केवळ दीड एक हजार मतांनी पराभव झाला. यांनतर २०२० मध्ये अरुण लाड यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांची संधी गेली. यामुळे बॅकअप, क्षमता आणि सध्या मतदारांचा पाठिंबा सोबत असताना राजकीय भविष्य पाहिजे असेल तर सारंग पाटील यांना उमेदवारी मिळवावी लागेल. सारंग पाटील लंबी रेस का घोडा असल्यानं ते शरद पवार गटाच्या भविष्यातील नेतृत्वासाठी अतिशय महत्वाचे असले तरी काही स्थानिक स्वकीयांना नको आहेत हेही तितकंच खरं.
यानंतर येणाऱ्या सत्यजित पाटणकर यांनी मुंबई पेक्षा दिल्लीची वाट धरली तरच त्यांना रस्ता सापडेल अशी परिस्थिती असल्याने त्यांनि लोकसभा लढवणं महत्वाची असल्याची चर्चा आहे. उदयसिंह उंडाळकर यांच्यासाठी एकतर पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा लढवावी अन्यथा उंडाळकरांना उमेदवारी देऊन कराड दक्षिणेचा गुंता सोडवावा असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा सूर ऐकू येतोय. तर सुनील माने यांना लोकसभेचं तिकीट मिळालं तर माजी पालकमंत्र्यांसाठी आगामी विधानसभेत गेम चेंजर ठरू शकतील अशी वोट बँक सिक्युअर होत असल्यानं माने यांची उमेदवारीसुद्धा पुढे केली जात असल्याचीही चर्चा आहे.