सातारा- मेढा रस्त्यावर अज्ञात वाहनांच्या धडकेत पुतण्या ठार, चुलती गंभीर जखमी

सातारा | सातारा- मेढा रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीस ठोकरल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशीरा घडली आहे. सातारा-मेढा रस्त्यावरील नुने गावाजवळील नंदिचा चढ येथील वळणावर झाला.

अपघातात युवक तानाजी दौलत इंगळे (वय- 32, रा. इंगळेवाडी- सातारा) हा व त्याची चुलती यमुना पांडुरंग इंगळे (वय- 72) हे दोघे साताऱ्याकडे जात होते. वाटेतच नंदीचा चढ येथील वळणावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस ठोकरले. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात तानाजी हा जागीच ठार झाला. तर त्याची चुलतीचा पाय तुटून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

तानाजी हा सातारा येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत असून त्याला पत्नी व दोन लहान मुले आहेत. घटनास्थळी सातारा तालुक्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे व उपनिरिक्षक एस. व्ही. देव यांच्यासमवेत पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. जखमीस शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास तालुका पोलिस करत आहेत.