सातारा | सातारा नगरपालिकेच्या ऑनलाइन झालेल्या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांत विविध विषयांवरून खडांजगी झाली. सभेत ठेवण्यात आलेल्या 58 पैकी 54 विषयांना मंजुरी देण्यात आली.
घरपट्टी माफी, गाळे भाडे, अतिक्रमणे, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठीची खरेदी आदी विषयांवरील चर्चेदरम्यान वाद झाल्याने आरोग्य विभागासह इतर तीन विषय तहकूब करत उर्वरित ५४ विषयांना मंजुरी देण्यात आली. चार तास चाललेल्या या सभेत अनेक विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येत प्रशासनाची कोंडी केल्याचे दिसून आले.
ऑनलाइन सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माधवी कदम होत्या. सभेसाठी मुख्याधिकारी अभिजित बापट याच्यासह पालिकेचा अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सभेत गुरूवार पेठेतील व्यापारी गाळ्यावरून पालिका प्रशासनास चांगलेच धारेवर धरले होते. अखेर प्रशासनाने संबधितांकडून 10 वर्षाचे भाडे वसूल केले जाईल असे सांगण्यात आले.
मालशे पुलाची चाैकशी रूंदीकरणाची चाैकशी
मालशे पुलाच्या रुंदीकरणाच्या नावाखाली बिल्डरला फायदा होईल, असे काम झाल्याचा आरोप अॅड. डी. जी. बनकर, अशोक मोने यांनी सभेत केला. स्वहित जोपासण्यासाठी पालिकेचे विनाकारण 50 लाख रुपये खर्च झाल्याचा आरोपही त्यांनी केल्यानंतर त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सोमवारपर्यंत (ता. 6) तयार करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला. गेले काही दिवस या विषयावरून पालिका प्रशासन चर्चेच्या केंद्रस्थानी असून या कामासाठी एका नगरसेवकाने बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरल्याचेही समोर येत होते.