सातारा | वाकळवाडी (ता. खटाव) येथे गहू, हरभरा, कांदा पिकाच्या शेतात लावलेला 75 किलो वजनाचा अफू पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. त्याची किंमत 1 लाख 52 हजार 700 रुपये होते. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, शांताराम रामचंद्र मोप्रेकर, चंद्रप्रभा शिवाजी मोप्रेकर, विमल पंढरीनाथ म्होप्रेकर (रा. वाकळवाडी, ता. खटाव) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत वडूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकळवाडी येथील शिवारात सुमारे एक गुंठे क्षेत्रात अफूची लागवड केली असल्याची माहिती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी कर्मचाऱ्यांसह संबंधित ठिकाणावर छापा टाकला. या छाप्यात वाकळवाडी शिवारात शांताराम मोप्रेकर, चंद्रप्रभा मोप्रेकर, विमल म्होप्रेकर यांनी स्वमालकीच्या शेतात गहू, हरभरा, कांदा पिकाच्या आडोशाला अफूची लागवड केल्याचे दिसून आले. अफू लागवडीनंतर सुमारे दोन ते अडीच फूट उंचीचे ओलसर हिरवीगार पाने, त्यांना पांढरी फुले व हिरवे गोलाकार बोंडे असलेली पान फुलांचे तयार झालेल्या एकूण 75 किलो वजनाची 7 पोती पोलिसांना आढळून आली. औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम कलमानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात केली. कारवाईत मालोजीराव देशमुख, पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर, दादा देवकुळे, संदीप शेडगे, दऱ्याबा नरळे, दीपक देवकर, भूषण माने, शिवाजी खाडे, सागर बदडे, मेघा जगताप, वृषाली काटकर यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याची फिर्याद पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी दिली असून, अधिक तपास मालोजीराव देशमुख करीत आहेत.