पाटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यात रविवारी संध्याकाळी धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मोरणा विभागात ही घटना घडली असून याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस दाखल झाले आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हल्लेखोर मदन कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गोळीबारामध्ये एकाने दोघांवर गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून यामध्ये दोन जण ठार झाले आहेत. याचबरोबर संबंधीताने आजूबाजूलाही मोठ्या प्रमाणात गोळीबार केल्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण होते. ठाणे शहरातील माजी नगरसेवक व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे व्यक्ती म्हणून मदन कदम यांची ओळख असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, व्यक्तीगत कारणातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुरेघर धरणामध्ये लगतच ही घटना घडली आहे. शिद्रुकवाडी येथे गुरेघर धरण परिसरात गोळीबार झाला असून यामुळे पाटण तालुक्यात तणावाचे वातावरण आहे. पाटण पोलीस पुढील तपास करत आहेत.