सातारा (Satara News) : मागील काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. यामध्ये प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. १५ किलो चांदी बस मधून चोरीला गेल्याची घटना सुरु असताना आता मुंबई ते सातारा प्रवासादरम्यान ६ लाख ६३ हजर रुपयांचे दागिने लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मारुती हरिबा उतेकर, वय ७५, राहणार निपाणी तालुका जावळी हे मुंबई वरून साताऱ्याच्या दिशेने येत होते. यावेळी त्यांच्याजवळ सोन्याचा गोफ, लक्ष्मी हार, नथ, अंगठी असा ऐवज असलेला बॉक्स होता. प्रवासावेळी त्यांच्याकडील तब्बल ६ लाख ६३ हजार रुपयांचे दागिने असलेला बॉक्स चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, उतेकर यांनी या प्रकारानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सातारा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु असून मुंबई पुण्याहून गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. चोर नेमका याच संधीचा फायदा घेत असून नागरिकांनी प्रवासादरम्यान योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.