व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वाहनांची परस्पर विक्री : 2 कोटी 65 लाख रुपये किमतीची 24 वाहने जप्त

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

महाराष्ट्रसह गुजरात राज्यामध्ये ट्रक, टेम्पो व इतर चारचाकी वाहनांची थकीत हप्ते भरून चालवण्यासाठी घेवून वाहनांची परस्पर विक्री करून फसवणुक करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन भामटयांना अटक करण्यात आली आहे. तसचे त्यांच्याकडून सुमारे 2 कोटी 65 लाख रुपये किमतीची 24 वाहने जप्त केली आहेत.

याबाबात पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाणेचे हददीमधील इंडो स्टार कॅपिटल फायनान्स शाखा सातारा येथून सचिन बजरंग चव्हाण (रा. एकंचे ता. कोरेगाव जि. सातारा) यांनी एक दहा टायरी ट्रक फायनान्सकडून कर्जाने घेतला होता. सदर ट्रकचे हप्ते थकित राहिलेने फायनान्स कंपनीचे एजंटचे ओळखीने सदर ट्रक हा उन्मेश उल्हास शिर्क (रा. निरा ता. पुरंदर जि. सातारा) यास ट्रक हा थकित हप्ते भरून ठराविक रक्कम देवून चालविण्यास घेतला होता. या ट्रकचे हप्ते थकित राहू लागल्याने सदर ट्रक मालकाने संबंधितास हप्ते भरण्याबाबत सांगितले.

परंतू त्यास वारंवार टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे येवू लागल्याने तसेच पैसे न भरता ट्रक देखील देत नसल्याने आपली फसवणूक झालेबाबत त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी इतर व्यवसायिकांकडून अधिक माहिती घेतली असता संबंधित व्यक्तिने अशाच प्रकारे अनेक लोकांची फसवणूक केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात उन्मेश उल्हास शिर्क (रा. निरा) याचे विरुद्ध तक्रार दिली.

पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता त्यांना अब्दुल कादीर सय्यद (रा. सुपा ता. पारनेर जि. अहमदनगर) याचा यामागे हात असून तो आरोपी असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. महाराष्ट्रसह गुजरात राज्यातील सामान्य नागरिकांची याप्रकारे मोठया प्रमाणात आर्थिक फसवणुक झाल्याचे तपासात दिसून आल्याने याप्रकरणी अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी सातारा शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या. त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पथकातील उपनिरीक्षक समीर कदम यांना मार्गदर्शनाखाली आरोपीस मुंबई व एकास पुणे येथून अटक केली.

धक्कादायक माहिती समोर

या प्रकरणात तपास केला असता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. ती म्हणजे दोन आरोपींनी सातारा,पुणे, मुंबई, सोलापूर, अहमदनगर,बीड, औरंगाबाद, बुलढाणा, पनवेल, ठाणे, रायगड,सांगली, गोवा, गुजरात अशा विविध भागातून वरील प्रमाणे कोटयावधी रुपयांची आर्थिक फसवणुक केली असल्याचे दिसून आले.

वाहनांची किंमत 2 कोटी 65 लाख

आरोपीकडून 14 ट्रक, 7 टाटा मॅजिक (छोटा हत्ती), 14 सुमो, 2 बोलेरो, 1 स्विफट अशी 2 कोटी 65 लाख रुपयांची एकूण 24 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. अजून 15 ते 20 वाहने हस्तगत करण्याचे काम चालू आहे. या आरोपींनी सातारा जिल्हयामध्ये अशा पद्वधतीने 40 ते 45 वाहन धारकांना फसविलेले आहे. आतापर्यत आरोपीनी सातारा जिल्हयात एकुण 4 ते 5 कोटी रुपयाची फसवणुक केली आहे.