सातारा प्रतिनिधी | सकलेनमुलाणी
जिल्ह्यात आज मंगळवारी सकाळी पुन्हा ८ नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कराड, खटाव, लोणंद आदी भागात हे कोरोना बाधित सापडले असून यामुळे सातारकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज सकाळी जिल्ह्यातील ८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून ते कोविड १९ बाधित असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी सांगितले. तसेच १० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एकूण ३२ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले असल्याचे सांगण्यात आले आहे. नवीन सापडलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश जण हे पुण्य मुंबईहून प्रवास करून आलेले किंवा त्यांचे निकटवर्तीय आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेला लोणंद येथील मुंबई येथून प्रवास करुन आलेला एक 33 वर्षीय पुरुष व मायणी ता. खटाव येथील अकोला येथून प्रवास करुन ओलेले 55 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे म्हासोली गावातील कोविड बाधित रुग्णाचे निकट सहवासित दोन पुरुष अनुक्रमे 45 व 62 वर्षे आणि तीन महिला अनुक्रमे 48, 35 व 60 वर्षे असे एकूण 8 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
तसेच मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेऊन आलेली 58 वर्षीय खंडाळा येथील एका महिलेचा अहवाल कोविड बाधित आल्याने या महिलेला क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल करण्यात आले आहे. या रुग्णावर मुंबई येथे उपचार झाल्याने तीची गणना मुंबई येथे केली असल्याने या जिल्ह्यात गणाना केली जाणार नाही.
32 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल तर १० जणांचे अहवाल निगेटिव्ह
दि.18 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील विलगीकरण कक्षात 32 जणांना दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 146 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 71 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 73 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.