हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा हा महाराष्ट्र्रातील ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मराठ्यांची राजधानी असेही या जिल्ह्याला संबोधलं जाते. परंतु पर्यटनाच्या (Satara Tourism) बाबतीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा काहीसा मागे आहे. त्यावरच मार्ग काढण्यासाठी आणि साताऱ्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी, जिल्ह्यातील पश्चिम घाट भागातील धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील नियोजन विभागाने 381.56 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार– Satara Tourism
सरकारच्या जीआरनुसार, श्री क्षेत्र महाबळेश्वरमधील प्रकल्प, प्रतापगड किल्ल्याचे संवर्धन आणि विकास, सह्याद्री व्याघ्र राखीव वनक्षेत्रातील पर्यटन विकास आणि कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रांतर्गत कोयना नदीचे जल पर्यटन यासह विविध विकासात्मक प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. हे सर्व प्रकल्प तब्बल 381.56 कोटींचे असून यामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळाचा कायापालट होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत मुनावळे येथील जलक्रीडा देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील निसर्गाचे संवर्धन व्हावे, ऐतिहासिक, धार्मिक, जल पर्यटनस्थळांचा, निसर्गपुरक विकास व्हावा, जिल्ह्यात पर्यटकांची (Satara Tourism) संख्या वाढावी या हेतूने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने मुंबईत आणि पुण्यात संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले होते तसेच सुधारीत पर्यटन विकास आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 8 फेब्रुवारी मुंबईत आणि तदनंतर पुण्यात यासंदर्भात बैठक घेतली होती. त्यानंतर वेगाने कार्यवाही होऊन 22 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत सुधारित पर्यटन आराखड्यास मान्यता घेण्यात आली. शिखर समितीच्या मान्यतेनंतर त्यासंदर्भातील शासन निर्णय नियोजन विभागाकडून मंगळवारी जारी करण्यात आला